Viral Video : तरुणाचं गाणं ऐकून पोलिसही झाले स्तब्ध; शेवटी अशी होती प्रतिक्रिया
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन पोलीस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले.
Mumbai Viral Video : मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या धावत्या मुंबईचा आधार घेतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात तर काहींची नाही. मात्र मुबंईकर हा धावतच असतो.अशा मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) हे कायमच सतर्क असतात. वेळप्रसंगी कधी कडक शिस्त दाखवून ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कधी कधी त्यांच्यांही वर्दीच्या मागे एक माणूसच असल्याची जाणीवही काही प्रसंगातून होऊन जाते. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या मरीन लाईन्सवर (Marine Lines) पाहायाला मिळाला आहे.
गस्त घालताना पोलिसांनी अडवलं आणि...
रात्रीच्या वेळीही मरीन लाईन्सवर मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र जमा होत असते. यावेळी मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून गस्त घातली जाते. अशाच एका रात्री मरीन लाईन्सवर पोलिसांना गस्त घालत असताना काही तरुण दिसले. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले आणि त्यानंतर जे काही झालं ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
केसरिया गाण्याने पोलिसही मंत्रमुग्ध
पोलिसांच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी एका तरुणाला थांबवले असून तो गिटार वाजत गाणे म्हणत आहे. मरीन ड्राईव्ह येथे या तरुणाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांसमोर 'केसरिया तेरा इश्क है पिया' हे गाणे गायले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ शिवा नावाच्या कलाकाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या क्लिपमध्ये मुंबई पोलिसांचे दोन पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत उभे असलेले गाणाऱ्या मुलाचे मित्र रस्त्याच्या कडेला उभे राहून हे गाणे ऐकत आहेत. त्या मुलाने 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' हे लोकप्रिय गाणे गिटारवर वाजवले. त्यानंतर उपस्थित सर्वच लोक मंत्रमुग्ध झाले. गाण्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठं हसू दिसून आले.
इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला सुमारे 1.3 लाख लाईक्स आणि 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पोलीसही या तरुणाचे कला पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच नेटिझन्सकडूनही या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देण्यात आहेत.
दरम्यान, मुंबईकर सध्या नवीन वर्षाच्या तयारीला लागले असून मोठ्या प्रमाणावर नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत.