मुंबई : 'झी २४ तास'वर झालेल्या 'मुक्तचर्चा' या कार्यक्रमात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर आपली मतं मांडली. संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप संबंध, महाराष्ट्राचं राजकारण, तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीविषयी भाकीतं मांडली. 'मुक्तचर्चा' या कार्यक्रमात 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. 'मुक्त चर्चा'चं प्रसारण आज (८ जून) रात्री १० वाजता, 'झी २४ तास'वर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुक्तचर्चा'मध्ये संजय राऊत यांनी राजकारणातील अनेक महत्वाच्या विषयावर संवाद साधला. या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी २०१९ साली देशात कोणत्या पक्षाचं सरकार असेल किंवा लोकसभेचं नेमकं चित्र काय असेल, याविषयी संजय राऊत यांनी काही भाकीतं केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही संजय राऊत मोकळेपणाने बोलले आहेत. भाजप येत्या लोकसभेत किती जागा जिंकेल, याचा देखील अंदाज त्यांनी मुक्तचर्चामध्ये व्यक्त केला आहे.


'मुक्तचर्चा'मध्ये संजय राऊत नेमकं काय म्हणाले...


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता
२०१९ च्या लोकसभेसाठी विरोधीपक्ष पंतप्रधानपदासाठी सर्वानुमते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाला सहमती मिळू शकते.
२०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या किमान ११० जागा कमी होऊ शकतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कृतीमागे दीर्घकालीन विचार असतो.
युती होणार किंवा नाही, याचा निर्णय पक्षाचे नेते घेतील.



भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय झालं, हे संजय राऊत यांनी सांगितलेलं नाही. मात्र भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की नाही, याचा निर्णय हे पक्षाचे नेतेच घेतील असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.