मुंबई : झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत.  हे या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ गरीब आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.


या उपक्रमाला केवळ सामन्यांनीच पाठिंबा दिला नाही तर अनेक नामवंत राजकारणी आणि सिने अभिनेत्यांनी दिला आहे.  


झी २४ तास संपूर्ण एक महिना हा मदत निधी गोळा करणार असून  जुलै महिन्यात रोजी मुंबईत एका शानदार समारंभात राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव आणि  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित प्रतिभावंत विद्यार्थ्यांना हा निधी प्रदान करण्यात येणार आहे. 


यावर्षी आम्ही अशाच २० मुलांसाठी मदतीचं आवाहन सर्व प्रेक्षकांना करीत आहोत. यापैकी काही मुलांना तरी आपण मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे. आपल्याला ज्या मुलांना मदत द्यायची आहे अशा मुलांच्या नावे धनादेश द्यावा ही विनंती.


धनादेश पाठविण्याचा पत्ता - झी २४ तास, ४ था मजला, 'बी' विंग, मधु इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, ४००००१३, 


संपर्कासाठी - ०२२ २४८२७८२१, ०२२२४८२७७७७ 



 


झी २४ तास संघर्षाला हवी साथ - २०१७ 


विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे -


१.  तन्मय अगंद शिराळ.  उस्मानाबाद    मार्क्स ९४.२०%


वडिलांची रस्त्यावर चहाची टपरी, शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत चहाच्या टपरीवर काम करत मिळालेल्या वेळेत अभ्यास करुन ९४.२० टक्के मिळवले. उस्मानाबाद शहरात एका पत्राच्या झोपडीत राहणाऱ्या तन्मयच्या कुटुंबाकडे आर्थिक उत्पनाचे अन्य कोणतेही साधन नाही.


२.  कु. ऋतुजा मिलिंद सुरवसे.    मार्क्स ९२%


वडील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून कामाला जातात, तर घरात गंभीर आजार झालेली आई, विजेची सोय नसलेल्या घरात रॉकेलच्या दिव्यावर ऋतुजाने अभ्यास केला. शिक्षणाच्या गोडीमुळे दररोज २० किमी अंतर सायकलवरुन ती शाळेत जायची. तिला होणारा त्रास कमी व्हावा म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी काढून तिच्या बस प्रवासासाठी पासची व्यवस्था केली होती.


३.  शेख मोहम्मद जाबीर मोहम्मद इलियास, मुंब्रा ठाणे  मार्क्स - ९०%


दोन्ही पायाने अपंग असलेल्या मुंब्राच्या एका झोपडीत राहणारा मुलगा. आई-वडील दोघेही गावी. गेल्यावर्षी पैसे नसल्याने मोठी बहीण दहावीची परीक्षा देऊ शकली नाही. दोन्ही पायांनी अपंग असतानाही मोहम्मद कुबड्याच्या सहाय्यानं रोज ३ किमी दूर असलेल्या महापालिकेच्या शाळेत जात होता. आपल्या बहिणीचाही अभ्यास त्यानं घेतला. बहीण ५३ टक्के मिळवून पास झाली आणि मोहम्मदने इलयासने तर ९० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले.


४. पायल नरेश पाटील,रायगड   मार्क्स – ९०%


रायगड जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणारी पायल ही पूर्णपणे (100 टक्‍के ) कर्णबधीर आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. आई मोलमजुरी करून कुटुंब चालवते. सहावीत असताना गालगुंडाच्‍या आजारात तिला हे अपंगत्‍व आले. पण अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीनं दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांनी उत्तीर्ण होत आईच्या कष्टाचं चीज केलं.


५. शीतल बोकडे.   मुंबई       मार्क्स –९२.४०%


प्रभादेवीत कामगार नगर २ इथं भाड्याच्या झोपडपट्टीत पोटमाळ्यावर आई-वडिलांसोबत राहते. वडील फूल मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करतात. भाऊ बारावी पास झाला आहे. शितलला ही सायन्ससाठी अँडमिशन घ्यायचे आहे. 


६. मनोज राजेंद्र शिंदे.  दौंड, पुणे      मार्क्स - ९१%


लहान असतानाच वडिलाचे छत्र हरपले. आई,आजी, आजोबाने सांभाळ केला. या वयातच घरातील कर्ता पुरुष म्हणून जबाबदारी अंगावर पडली. कमविण्याचे साधन पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय. मूळ गाव इंदापूर पण उपजिविकेच साधन नसल्यामुळे एका रानातून दुसऱ्या रानात पालामध्ये राहूनच अभ्यास केला. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाची आवड असल्याने त्याची बहीणही दहावीत शिकतेय. 


७.  मुकेश पावरा.   धुळे       मार्क्स - ९०%


अशिक्षित, गरीब आदिवासी कुटुंबातील कष्टाळू आणि जिद्दी मुलगा. आश्रमशाळेत शिकणारा. आश्रमशाळेत शिकून ९० टक्के गुण मिळवलेच. पण हॉटेलमध्ये वेटरचे काम करून कुटुंबाला मदत केली. हा गरीब पण गुणवान आदिवासी मुलगा आयुष्यात आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची मनीषा बाळगून आहे. त्यासाठी त्याला पुढे शिकायचंय.


८. सचिन देवरे.  सटाणा, नाशिक    मार्क्स - ९२%.  


आई वडिलांचं छत्र लहानपणीच गमावलेल्या सचिनचा सांभाळ त्याची ७४ वर्षांची आजी शेतात मोलमजुरी करून करतेय. म्हाताऱ्या आजीचे कष्ट कमी व्हावेत म्हणून तिचा हा नातू पाचवीत असल्यापासून किराणा दुकानात मजुरी करतो. ७ ते १२ शाळा आणि मग किराणा दुकानात मजुरी. त्यानंतर रात्री घरी पोहचल्यानंतर अभ्यास. इतके कष्ट करून त्यानं दहावीत तब्बल ९२ टक्के गुण मिळवलेत. त्याला पुढे खूप शिकायचंय.


९. रसिका साळगावकर.  वसई        निकाल – ९९.४


दहावीत शिकत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. पोळीभाजी केंद्रात काम करून पोरींना सांभाळणाऱ्या आईची कमाई महिन्याकाठी केवळ साडेचार हजार रुपये. त्यात मोठी बहीण इंजिनिअरिंगला. कोणताही खाजगी क्लास न लावता शाळेसाठी दोन किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या रसिकानं परिस्थितीवर मात करत तब्बल ९९.४० टक्के गुण मिळवले.


१०. स्वाती भिकन पाटील,जळगाव     निकाल – ९१.६०


अस्थिव्यंगामुळे वडील घराबाहेर पडू शकत नाहीत. एक बिगा शेती पंधरा वर्षांपूर्वी विकलेली. अशा परिस्थितीत स्वतः स्वाती शनिवार, रविवार आणि अन्य सुट्ट्यांमध्ये शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. कॉमर्स विषय घेऊन बँकिंग क्षेत्रात काम करण्याची मुलीची इच्छा आहे. पुढच्या शिक्षणासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे.


११. प्रतीक्षा ठाकरे,   अमरावती      निकाल – ९१.२०


आई-वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात.सुट्टीच्या दिवशी प्रतीक्षाही शेतात राबते. फक्त एका खोलीचं घर.  त्यातच अभ्यास. अशा प्रतिकुल परिस्थितीत कुठल्याच विषयाची शिकवणी न लावता प्रतीक्षाने 91.20 गुण मिळवले आहेत.


१२. अक्षय सोमनाथ शिंदे,   माकोडी, हिंगोली   निकाल – 91 %


हिंगोली जिल्ह्यातील मकोडी येथील पारधी समाजाच्या अत्यंत गरीब कुटुंबातील अक्षय सोमनाथ शिंदे या विद्यार्थ्याने ९१ टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या जातीत जन्मलेल्या अक्षयचे आई वडील मोलमजुरी करून पोट भरतात. साधं कुडाचं घर. हातावरच पोट असल्याने काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही. अभ्यासाची गोडी लागलेल्याअक्षयने सुट्टीच्या दिवशी मजुरी करून आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय.


१३. मानसी सकपाळ, घाटकोपर       निकाल – ९४%


झोपडपट्टीतील भाड्याच्या घरात आजी, आई सोबत राहते. आई आजारी असूनसुद्धा धुणी भांडी करत महिन्याला 7000 रुपये कमवते. घराचे भाडे, आजीचा औषधाचा खर्च मुलीची शाळेची फी असा सर्व खर्च त्यातच भागवायचा. पण गरीबीवर मात करून मानसीने 94 टक्के गुण मिळवले. तिला पुढे डॉक्टर होऊन जनतेची सेवा करायची आहे.


१४.  तेजस्विनी तरटे, लातूर निकाल – ९८.२०%


आईसोबत धुणी भांडी करुन तेजस्विनीने मिळवले ९८.२० टक्के गुण. दोन महिन्यांची असताना वडिलांचे कर्करोगामुळे छत्र हरपलेले. आईने धुणी भांडी करून दोन मुलींचा संभाळ केला.  १० वीचा निकाल लागला त्याही दिवशी  तेजस्विनी आईला मदत करण्यासाठी मोठ्या बहिणीसोबत धुणीभांडी करायला गेली होती.


१५. योगिता पाटील, मालपूर, धुळे        निकाल – ९१ %


शिक्षणाचा आणि तिच्या कुटुंबाचा दुरान्वये संबंध नाही. आई , भाऊ आणि बहीण मूकबधिर. त्यात मरणाची गरिबी. कुटुंबातील या वातावरणातही योगिताची शिकण्याची जिद्द भारी. दहावीत ९१ टक्के गुण मिळवून तिनं आपली गुणवत्ताही सिद्ध केलीय. स्वतः असं देदिप्यमान यश मिळवतानाच योगिताने तिच्या मूकबधीर बहिणीचाही अभ्यास घेतला आणि तीदेखिल तब्बल ८४ टक्के गुण मिळवून पास झाली. योगिताच्या पुढच्या शिक्षणासाठी मदतीची गरज आहे. 


१६. शैलेश मंडलिक  दहीसर, मुंबई        निकाल – ९१%


दहिसर पूर्वेतील रावळपाडा येथे दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या शैलेशने ९१ टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं. काविळीच्या आजारात वडिलांचं निधन झाल्यानंतर आईनं घरकाम करून मुलाला शिकवलं. शैलेशनं आईच्या मेहनतीचं चीज करत घवघवीत यश मिळवलं.


१७.   तुषार जावीर सांगली   निकाल – ९३.४०%


झोपडीत राहणाऱ्या तुषारची परिस्थिती हालाकीची. वडील नसल्यानं आई शिवणकाम करून तुषारला शिकवते. आईला मदत करण्यासाठी तुषारनंही शेतात मजुरी केली. कोणत्याही शिकवणीशिवाय त्यानं ९३.४० टक्के गुण मिळवले.


१८.  दत्ता वाघिरे  बीड      निकाल – ९७%


वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचं निधन झालं. तीन मुलांच्या सांभाळासाठी आईनं कष्ट उपसले. आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दत्तानं ९७ टक्के गुण मिळवून दहावीत यश मिळवलं. दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या त्याच्या दोन बहिणींसाठीही त्याला काहीतरी करायचंय.


१९.   जागृती मंडपे, गिम्हवणे, दापोली        निकाल - ९४%


जागृतीच्या घरात एकूण पाच माणसं. २००९ पासून वडील आजारी असल्यानं घरी. २० किलोमीटर एका खासगी कॉलेजमध्ये चहा बनवण्याचं काम करणाऱ्या आईला महिन्याला तीन हजार रुपये मिळतात. त्यात दोन मुली आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च. अशा कुटुंबातील जागृती मंडपेनं परिस्थितीवर मात करून तब्बल ९४ टक्के गुण मिळवलेत.


 


२०. तन्मय ढवळे वाशीम    निकाल- ९७.४०%


घरची परिस्थिती हालाकीची. टीबी झालेले वडील, आईला डोळ्याने दिसत नाही. आधी हलकी कामं करणाऱ्या वडिलांना टीबीचा त्रास वाढल्यानंतर काम करता येईना. अभ्यासात हुशार असलेल्या तन्मयच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या मित्रांनी केला. तन्मयनंही ९७.४० ट्कके गुण मिळवून त्यांच्या मदतीचं चीज केलं. पुढच्या शिक्षणासाठी त्याला मदतीची गरज आहे.


 


या गरीब पण गुणवान मुलांच्या नावे चेक लिहून पाठवा.


धनादेश पाठविण्याचा पत्ता - झी २४ तास, ४ था मजला, 'बी' विंग, मधु इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, ४००००१३.


संपर्कासाठी फोन नंबर - ०२२ २४८२७८२१ (  ११ ते ९ या वेळेत)  ०२२२४८२७७७७