मराठी शाळा बंद करण्याचा अधिकार संस्थेला नाही, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी
पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत या शाळेत साधारणत: ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
दीपाली जगताप - पाटील, झी २४ तास, मुंबई : 'झी २४ तास'च्या बातमीनंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला जाग आलीय. गोरेगाव पश्चिममध्ये जवाहरनगर येथील 'विद्यामंदिर' मराठी शाळा बंद होणार असल्याप्रकरणी 'झी २४ तास'ने ३ मे रोजी विशेष वृत्त प्रसारित केले. त्यानंतर आता शिक्षण विभागाने 'विद्यावर्धिनी संस्थे'ला पत्र पाठवलंय. शाळा बंद करण्याचा अधिकार संस्थेला नसल्याची भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलीय. त्यामुळे पालकांना 'दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या' असं सांगणाऱ्या विद्यावर्धीनी संस्थेला आता शाळेसाठी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.
पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत या शाळेत साधारणत: ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील बहुतांश मुलं मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील आहेत. माजी विद्यार्थ्यांनही शाळा बंद करण्यामागचं कारण विचारण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यांना उत्तर तर मिळालं नाही उलट त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करुन दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.