कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखच्या यशाची बातमी सर्वप्रथम झी २४ तासने दाखवली होती. कठीण परिस्थितीवर मात करत अस्माने दहावीमध्ये यश संपादन केलंय. या बातमीनंतर अस्माला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी युवासेनेनं घेतलीय. युवासेनेनं अस्माच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावीचा निकाल जाहीर झाला आणि मार्कांची चढाओढ पहायला मिळाली. १०० टक्के गूण मिळवणारे अनेक विद्यार्थीही पहायला मिळाले. परंतु मुंबईच्या फूटपाथवर राहून ४० टक्के गूण मिळवणा-या अस्मा शेखचे यश अधिक लखाखणारे आहे.


आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोरचा फूटपाथ तिचे घर...ना काही आडोसा ना डोक्यावर छप्पर..फूटपाथवर अंथरलेला प्लास्टिकचा कागद आणि त्यावरच वर्षानुवर्षे सुरू असलेली आयुष्याची लढाई. परंतु मुलगी अस्मा शेख दहावीत ४० टक्के गूण मिळवून ती पास झाल्यानं वडिल आयुष्यात पहिल्यांदाच एवढे खूष झाले असतील. आपलं आयुष्य जसं फूटपाथवर गेलं तसं पोरगीचं जावू नये,  यासाठी छोटी मोठी काम करत त्यांनी पोरगीला मस्जिद बंदरला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. ऊन,वारा, पाऊस झेलत...फूटपाथवर राहूनच अस्मानं दहावीचा अभ्यास केला. यासाठी बरंच कष्ट बाप लेकीला झेलावं लागलं.


कमी मार्क्स मिळालेत म्हणून ती खचून गेलेली नाही, उलट जोमानं पुढचं शिक्षण घ्यायचा तिनं निर्धार केलाय. आपल्य बापाला फूटपाथवरून स्वत:च्या घरात न्यायचं तिचं स्वप्न आहे.


अस्मा शेखच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कूरकूर करणा-या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. फूटपाथवर राहूनही तिनं मिळवलेलं ४० टक्के १०० टक्क्यांपेक्षा कमी नाहीत. मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचं नाही, पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द महत्वाची.



अस्मा सारख्या विद्यार्थीनीचं यश म्हणजे तिच्या प्रामाणिक मेहनतीला मिळालेली पावती म्हणावी लागेल.