बीड : मराठवाड्यातल्या निवडणुकांकडे सगळ्या राज्याचंच लक्ष लागलं होतं. त्यामध्येही महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे, बीडमधल्या परळीच्या निकालाबाबत सा-यांनाच उत्सुकता होती. परळीसह एकंदर मराठवाड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनं मुसंडी मारलेली पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळीमध्ये राष्ट्रवादीच्या सरोजिनी हलगे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा, भूम, कळंब, तुळजापूर नगरपालिकेवर, राष्ट्रवादीचा झेंडा आणि नगराध्यक्ष निवडून आलाय. तर मुरुम आणि उमरगा काँग्रेसनं जिंकलीय. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड आणि सोनपेठ नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात गेलीय. तर पाथरी आणि जिंतूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीनं कब्जा मिळवलाय. 


सेलूमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे विनोद बोराडे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसच्या पवन आढळकरांचा पराभव केला. काँग्रेसचे माजी आमदार रामदास बोर्डिकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मानवत नगराध्यक्ष निवडणुकीत आधी काँग्रेसचे बापूराव नागेश्वर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र फेरमतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं गेलं. 


जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि परतूर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय. तर अंबड नगरपालिकेवर भाजपनं कब्जा मिळवलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या बसमतनगर नगरपालिकेवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं असलं तरी, नगराध्यक्षपदी मात्र शिवसेनेचे श्रीनिवास पोरजवार विजयी झाले आहेत.