भगवान शंकराची १० नावं आणि त्याचा अर्थ
शिव हा शब्द `वश्` या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
मुंबई : शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
भगवान शंकराची १० नावं :
१. शंकर : 'शं करोति इति शङ्करः । 'शम्' म्हणजे कल्याण आणि 'करोति' म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.
२. महाकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ आहे. महाकाळाचा जो ईश्वर आहे त्याला महाकालेश्वर म्हणतात.
३. भालचंद्र : भाली, म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे, तो भालचंद्र. शिवपूत्र श्री गणपतीला ही 'भालचंद्र' हे एक नाव आहे.
४. गंगाधर : गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता. शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले; म्हणून त्याला 'गंगाधर' असेही म्हणतात.
५. कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर’ असेही म्हणतात.
६. पिंगलाक्ष : छपिंगल + अक्ष. पिंगलाक्ष, पिंगल, पिंगळा, घुबडाची एक जात आहे. पिंगल या पक्ष्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कळतो. तसे शिवाला कळते; म्हणून त्याला `पिंगलाक्ष’ असेही म्हणतात.
७. अघोर : अघोर म्हणजे चिंता नसलेला.
८. नीळकंठ : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी कोणीही त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. तेव्हा शिवाने हालाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले. विषप्राशनामुळे त्याचा कंठ काळा-निळा झाला आणि त्याला नीळकंठ असे नाव मिळाले.
९. आशुतोष : जो सहज प्रसन्न होतो त्याला आशुतोष म्हणतात. भगवान शंकर देखील खऱ्या मनाने भक्ती करणाऱ्या भक्तावर प्रसन्न होतात.
१०. महादेव : परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण साधना हे तीनही ज्याच्यात आहेत, अशा देवास 'देवांचा देव' म्हणजेच 'महादेव' असे संबोधतात.