कसा झाला पांडवांचा मृत्यू ?
महाभारत... कुरुक्षेत्रावर झालेलं हे युद्ध जगातलं सगळ्यात जास्त रक्तरंजीत युद्ध असल्याचं नेहमी बोललं जातं.
मुंबई: महाभारत.. कुरुक्षेत्रावर झालेलं हे युद्ध जगातलं सगळ्यात जास्त रक्तरंजीत युद्ध असल्याचं नेहमी बोललं जातं. फक्त 18 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये भारतातील 80 टक्के पुरुषांना आपला जीव गमवावा लागला.
या युद्धाबाबत महाभारत या महाकाव्यामध्येही सगळ्यात जास्त भाग आहेत. कुरुक्षेत्रामध्ये पांडवांचा विजय झाला आणि कौरव पराभूत झाले, पण या विजयानंतर पांडवांचं काय झालं ? पांडवांनी हस्तिनापूरवर किती काळ राज्य केलं, त्यांचा मृत्यू कसा झाला ?
हस्तिनापूरवर पांडवांचं राज्य
कुरुक्षेत्राचं युद्ध पांडवांनी जिंकल्यानंतर युधिष्ठिराच्या नेतृत्वात पांडवांनी हस्तिनापूरवर राज्य करायला सुरुवात केली. कौरवांच्या या पराभवाला गांधारीनं कृष्णाला जबाबदार धरलं. यादव कुळाचाही आपल्या मुलांसारखा(कौरवांसारखा) नाश होईल असा शाप गांधारीनं कृष्णाला दिला.
यादवांचं बंड
हस्तिनापूरवर पांडवांनी तब्बल 36 वर्ष राज्य केलं. पण गांधारीनं कृष्णाला दिलेला शाप खरा ठरत होता. द्वारकेमधून कृष्ण यादवांना घेऊन प्रभासाकडे रवाना झाला. पण प्रभासामध्ये यादवांमध्येच बंड झालं, ज्यामध्ये जवळपास सगळ्याच यादव कुळाचा नाश झाला.
कृष्णाचा अंत
बंड करणाऱ्या यादवांचा नाश करण्याचा प्रयत्न कृष्ण करत असताना कृष्ण मरणाधीन अवस्थेत गेला. एका झाडाखाली झोपला असताना एका शिकाऱ्याचा बाण कृष्णाच्या डोळ्याला लागला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. व्यासांनी अर्जुनाला तुझा आणि कृष्णाचा उद्देश पूर्ण झाला, असं कृष्णाच्या मृत्यूनंतर सांगितलं.
द्वापार युगाचा अस्त
ज्यावेळी कृष्णाचा मृत्यू झाला तेव्हाच द्वापार युगाच्या अस्त आणि कलीयुगाच्या उदयाला सुरुवात झाली. राज्यामध्ये सुरु झालेला गोंधळ आणि अधर्मामुळे अखेर युधिष्ठिरानं पांडव आणि द्रोपदीसह हिमालयात जायचा निर्णय घेतला. भटक्या कुत्र्याचं सोंग घेतलेला यमही या सगळ्यांबरोबर हिमालयाकडे रवाना झाला.
पांडवांचा मृत्यू
हिमालय चढत असताना पांडवांच्या अंताला सुरुवात झाली. सगळ्यात पहिले द्रोपदी तर सगळ्यात शेवटी भीमाचा मृत्यू झाला.
इच्छा आणि त्यांच्या गर्वामुळे निर्माण झालेल्या समस्या या त्यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं बोलंल जातं. फक्त युधिष्ठिरानं कोणत्याच गोष्टीचा गर्व न केल्यानं तो आणि त्याच्याबरोबरचा भटका कुत्रा हिमालयाच्या शिखरावर पोहोचला.
युधिष्ठिर स्वर्गात
हिमालयाच्या शिखरावर म्हणजेच स्वर्गाच्या दारापाशी गेल्यावर युधिष्ठिराबरोबर असलेला भटक्या कुत्रा आपल्या मुळ रुपात म्हणजेच यमाच्या रुपात आला. स्वर्गामध्ये घेऊन जायच्या आधी यम युद्धिष्ठिराला घेऊन नरकात गेला, आणि द्रोपदी आणि पांडव आपल्या पापांची प्रायश्चित कशी भोगतायत ते दाखवलं.
त्यानंतर इंद्रदेव युद्धिष्ठिराला घेऊन स्वर्गात गेला. बाकीचे पांडव तसंच द्रौपदीलाही स्वर्गात जागा देऊ असं आश्वासन इंद्राकडून युद्धिष्ठिराला मिळालं.
अशा प्रकारे कृष्ण तसंच पांडवांचा अंत झाला आणि कलीयुगाला सुरुवात झाली असल्याची कथा आहे.