शिवसेनेसाठी धोक्याची घंटा


सुनील घुमे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला... सलग पाचव्यांदा शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला... शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचा आशीर्वाद यामुळंच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण मुंबईच्या बालेकिल्ल्यात 84 जागा जिंकणं, हा शिवसेनेचा खरंच विजय मानायचा का? गेल्यावेळच्या 76 वरून 84 अशी शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढली, हे खरंच यश मानायचं का? कारण... मुंबईत भाजपला मिळालेलं अभूतपूर्व यश... भाजपनं 31 वरून 82 अशी जोरदार मुसंडी मारलीय. शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ 2 नगरसेवकांचा फरक आहे. ज्या भाजपसोबत 25 वर्षं युतीचा संसार केला, त्या भाजपनंच अखेर शिवसेनेचा विजयरथ अडवला. भाजपच्या या घोडदौडीमुळं शिवसेनेचं यश पार झाकोळून गेलंय. जिंकूनही हार कशी होते, याचा अनुभव सध्या उद्धव ठाकरे नक्कीच अनुभवत असतील. म्हणजे जीत कर भी हारने वाले को उद्धव ठाकरे कहते है....


ही परिस्थिती नेमकी का ओढवली, याचा विचार आता तरी शिवसेना नेतृत्व करणार आहे का? की पाचव्यांदा नंबर 1 आलो, याचं सेलिब्रेशन करण्यात आणि पेढे खाण्यातच पक्षनेतृत्व धन्यता मानणार आहे? शिवसेनेच्या कामगिरीवर नजर टाकली तर एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे मराठी टक्का अजून तरी शिवसेनेच्या बाजूनं टिकून आहे. परळ, लालबाग, वरळी, दादर, नायगाव, माहिम अशा बालेकिल्ल्यात शिवसेनेनं झेंडा फडकवला. अर्थातच कट्टर शिवसैनिकांची पक्षनिष्ठा हे त्याचं मुख्य कारण आहे. पक्षानं दगड उभा केला असता तरी शिवसैनिकांनी आपल्या मेहनतीनं तो निवडून आणला असता. दक्षिण आणि मध्य मुंबईत मराठी टक्का शिवसेनेसोबत राहिला त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेनेनं केलेलं भावनिक राजकारण... मुंबई तोडण्याचा डाव, भाजप आपल्या मुळावर येतेय, ही भाषा इथल्या मराठी माणसाला अजूनही शिवसेनेसोबतचं नातं घट्ट करायला भाग पाडते. इथं नागरी प्रश्न सोडवले नाहीत तरी चालतात, 25 वर्षं शिवसेनेची सत्ता असूनही विकासकामं झाली नाही तरी चालतं... फक्त 'बाळासाहेबांचे कट्टर सैनिक' अशी कौतुकाची थाप एकदा पाठीवर मारायची. बस्स... मग इथले सैनिक कुणालाही अंगावर घ्यायला सज्ज होतात. शिवसेनेनं 84 नगरसेवकांपर्यंत जी मजल मारली ती या मराठी पट्ट्याच्या जोरावरच... नाहीतर गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मालाड, मुलुंड, घाटकोपर या गुजराती, कच्छी आणि मारवाडी बहुल भागात भाजपनं शिवसेनेला पार आडवं केलं. अंधेरी ते बोरिवली या पट्ट्यातल्या उत्तर भारतीयांनीही भाजपच्याच कमळाची पाठराखण केली. या अमराठी मतांच्या जीवावरच भाजपला 82 पर्यंत झेप घेता आली, हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही.


आता प्रश्न हा आहे की, शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल? भविष्यात भाजपशी युती करणार नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळंच मराठी बहुल भागातील शिवसैनिक त्वेषानं भाजपवर तुटून पडले. पण भविष्यात हा मराठी पट्टा शिवसेनेच्या ताब्यात राहणार आहे का? ज्या परळ लालबाग दादरच्या जीवावर शिवसेना नंबर वन म्हणून गमजा मारतेय, तो मराठी पट्टा आणखी किती काळ टिकणार आहे? पुनर्वसन प्रकल्पांच्या नावाखाली इथल्या मराठी माणसाच्या जागेवर अमराठी लोकांचे निवासी टॉवर्स उभे राहतायत. लालबागच्या भारतमाता सिनेमासमोरचा महाकाय, आकाशाला भिडलेला अविघ्न टॉवर असो, नाहीतर लोअर परळ भागात लोढा बिल्डरनं उभे केलेल्या गगनचुंबी इमारती असोत, इथं राहायला येणारे लोक मराठी असणार आहेत? टू आणि थ्री बीएचकेचे हे करोडो रूपयांचे फ्लॅट्स खरेदी करायची ताकद मराठी माणसामध्ये आहे? या टॉवरमध्ये राहायला येणारे बहुसंख्य लोक अमराठी असणार, हे तर उघड वास्तव आहे. आणि हे अमराठी लोक जेव्हा मतदार म्हणून आपली नोंदणी करतील, तेव्हा या भागातून शिवसेनेचे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून येऊ शकतील? विकासाच्या नावाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीच ही टॉवर संस्कृती मध्य मुंबईत रूजवली. वाड्या-वस्त्या, बैठ्या घरं आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-या मराठी लोकांना शिवसेनेनं पाणी, वीज, रस्ते अशा चांगल्या नागरी सुविधा पुरवायला हव्या होत्या. पण त्याऐवजी विकासाची स्वप्नं दाखवत शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींनी बिल्डरांना जवळ केलं. अलिकडच्या काळात तर नगरसेवक आणि आमदारांनीच बिल्डर म्हणून व्यवसाय करायला सुरूवात केली. प्रसंगी लोकांना जबरदस्ती करून घरं खाली करायला भाग पाडलं आणि विकासाच्या नावानं बिल्डरांकडून स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं. पण या बदल्यात आपण भविष्यात आपल्याच पायावर कु-हाड मारून घेतोय, याची जाणीव अजूनही इथल्या शिवसेना नेत्यांना नाही... आज नाही, पण आणखी 10 वर्षांनी त्याचे चटके शिवसेनेला सोसावे लागणार, एवढं नक्की... गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहणा-या चकाचक टॉवर्समधले अमराठी नागरीक मतदार म्हणून नोंदणी करतील आणि भाजपसारख्या पक्षांच्या पाठीशी आपली ताकद उभी करतील, तेव्हा शिवसेनेचे डोळे उघडतील. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल...


फार लांब कशाला, 2019 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसू लागतील. भाजपच्या धुरिणांनी अजून तरी मध्य मुंबईतल्या मराठी व्होट बँकेकडं म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. महापालिका निवडणुकीतल्या यशानंतर ही मराठी व्होट बँक फोडण्यासाठी भाजपचे चाणक्य एव्हाना कामाला लागले असतीलही... मराठी टक्का भाजपसोबत यावा, यासाठी रणनीती आखायला सुरूवात झाली असेल... भाजपच्या या धोक्याची जाणीव शिवसेनेनं आतापासूनच घ्यायला हवी.


महापालिका निवडणुकीचा ताजा निकाल, ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका आताच ओळखला तर ठीक... नाहीतर भविष्यात सेव्ह द टायगर अशी मोहीम राबवायची वेळ शिवसेनेवर आल्याशिवाय राहणार नाही...