मुंबई (ऋषी श्रीकांत देसाई, झी मीडिया): आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण दरवर्षी लेख लिहीताना मनामध्ये एक अनाम भिती असते.. मागच्या वर्षी तर सगळा लेख लिहीला यंदा परत काय नव्यानं लिहायचं ? तरीपण लिहायला घेतला की मन मुंबईत राहतच नाही. ते राजधानी आणि जनशताब्दीपेक्षाही दुप्पट वेगानं पुन्हा आंगणेवाडीच्या जत्रेत रमतं. आणि सुरु होतो आजपर्यंत पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या आठवणींचा एक विलक्षण खेळ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जत्रेतल्या त्या पाळण्यासारखा उंचच उच आभाळाला भिडणारा. रिंगाच्या खेळात अडकलेल्या वस्तुसारखं मन आठवणीच्या रिंगात अडकून पडते. मागे कुणीही नसताना कुणीतरी त्या गर्दीत तुम्हाला ओढत राहते आणि याच भक्ती आणि अनाम शक्तीच्या आवेगाचं नाव असतं, आंगणेवाडी जत्रा.


आंगणेवाडी... लौकीक दृष्ट्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक छोटेखानी गावं. महाराष्ट्राची दक्षिण काशी अशी आम्ही कोकणवासीयानी सर्वदूर पसरवलेलं शक्तीपीठ. आंगणेवाडीची यात्रा ही खरतर फक्त आंगणे कुटुंबियाची असते, पण या देवीवर महाराष्ट्रासह देशभरातल्या कोट्यवधी भक्तांचा विश्वास बसलाय कि आता हेच आमचं कुलदैवत ! 


लोकमानसात असलेलं भराडी आईचे नाव आता मंदिरावर भराडी बाई म्हणुन झळकतय. आठवणीत घट्ट बसलेलं कौलारु मंदिर आता छान रेखीव स्वरुपात नेत्रात भिनून जातं. दरवर्षी यात्रेला जावं आणि नित्यनव्यानं स्वताला काळाच्या खुप मागे न्यावं अशीही आंगणेवाडीची यात्रा आहे.


आंगणेवाडीची भौगोलिक हद्द पाहिली तर तशी ती साधारणपणे एका बाजुला बिळवसपासून , दुस-या बाजूला बागायतपासून, तर तिस-या बाजूला चित्रम घाटीपासून साधारणपणे सुरु होतं असं महसूली उत्तर मिळेल. पण खरं सांगतो, जत्रेसाठी जाणा-या चाकरमान्यांना विचारा आंगणेवाडी कुठून सुरु होते ?


ट्रॅव्हल्सने, ट्रेनने, एसटीने, खाजगी वाहनानं ज्या ज्या साधनानी प्रवास करणे शक्य आहे अशा सगळ्या वाहतुकीचे मार्ग वापरणा-यांना कुणालाही विचारा आंगणेवाडी जवळ आली कसं ओळखाल ? सर्वांच एकच उत्तर असेल वाशीची खाडी क्रॉस केली की इली आंगणेवाडी.. हे टेक्नीकली उत्तर चुकीचच असेल पण सायकॉलीजकली या पेक्षा दुसरं उत्तर असूच शकत नाही. 


भाविकांच्या आत लपलेल्या चाकरमान्यांच्या दृष्टीनं हे सगळं वाचताना  आणि अनुभवताना तो वेगवान प्रवास एव्हाना  उभाही झाला असेल म्हणा.. वाशीची खाडी क्रॉस केली की बाहेर नवी मुंबई कोकणाकडे सरकत असली  तरी मिटल्या डोळ्यासमोर उभी राहणारी चाकरमान्यांची खेडीपा़डी असते.. नजरेचा आणि नजरेला फसवणा-या मनाचा खेळ सुरु राहतो त्या अनामिक चैतन्याच्या ओढीनं.. 


आंगणेवाडी जत्रेच्या निमित्तानं अनेक बदलणा-या गोष्टी आणि बदलणा-या गोष्टीतही लपलेला मुळ ठामपणा हा सगळा विचार करायला लावणारा घटनाक्रम आहे. पारंपारिक प्रथेप्रमाणे पारध, त्यानंतर देवीला लावण्यात येणारा कौल आणि मग जाहिर झालेली यात्रेची तारीख.. 


आज जग फार जवळ आलयं.. पण अगदी हल्ली 2010 पर्यत या जत्रेची प्रसिद्धी म्हणजे सोशल ए़डव्हर्यटायझिंगचा एक अदभुत चमत्कार होता. पुर्वी या जत्रेच्या तारखेचा देवीनं कौल दिला कि, मग गावात येणा-या एसटीवर कुणीतरी ख़डूने जत्रेची तारीख असं लिही.. ती एसटी फिरुन शहरात जाईपर्यंत ज्या ज्या गावातून ती एसटी जाईल त्या त्या गावात आंगणेवाडीची तारीख समजे. मग एका एसटीतून दुस-या एसटीवर.. रिक्षाचालक तर स्वताहुन रिक्षाच्या टपावर लिहून देवीच्या जत्रेची तारीख लिहायचे. निष्काम भक्तीयोगाचं मालवणी मुलुखातलं हे अनाम रुप होत. 


या प्रत्येकाला देवीची जत्रा तुम्ही स्वताहून इतरांना कळवा असं कुणी कुणालाच सांगत नसायचा.पण प्रत्येकजण करायचा कारण प्रत्येकाची जत्रा प्रत्येक भाविकांपर्यत पोहचली पाहीजे अशी मनपुर्वक श्रद्धा असायची. आणि याच श्रद्धेतून गावातल्या पोस्ट ऑफिसातून म्हाता-या आवशीचो मुंबयच्या  चाळीत तलाच्या बाजुला नलाच्या खोलीच्या आंगाला रवना-या झिलाक फोन जायचा, मुलाचा रिप्लाय असायचा की नेमक्या त्याच तारखेला काहीतरी ऑफीसचं काम असायचं तो यंदा येऊ शकणार नाही. 


खर तर त्या माऊलीला त्या नकाराची अपेक्षाच नसायची. पुढं तो पोरगा बोलायचा आवशी तूच जा आनी देवीक माजो नमस्कार सांग. त्याचवेळी एवढा वेळ शांत असणारी ती माऊली ती ओरडायची, चुलीत गेली नोकरी, शिग्रेट फॅक्टरीजवळ सामान घेवन यायचा आनी रातरानीन गप्प सुनेक आनी नातवाक घेवन गावाक ये.. नोकरी गेली तरी चल्लात दुसरी गावात.. अरे तू जत्रेक ये , छप्पन नोकरीचे कॉल येतले.. माझी देवी खमकी हा.. 


हा सगळा प्रसंग कित्येक चाकरमान्यांच्या आय़ुष्यात शब्दश: घडला  असेल.. भरपगाराची नोकरी एका जत्रेसाठी बिनदिक्कत सोडून देण्याची भाषा करणारी माऊली सिंधुदुर्गाच्या खेड्यापाड्यात आज वेगवेगळ्या नावानी चाकरमान्याची आये म्हणून मिरवतत... हा सगळा श्रद्धेचा आणि अनाम उर्जेचा स्त्रोत आहे.. जत्रा सुरु होऊन कित्येक वर्ष झाली असतील पण आजही त्याच उत्साहानं आणि तेवढ्याच भक्ती कल्लोळात आंगणेवाडीचीही जत्रा लक्षावधी भाविकांना एकाच दिवशी भेटावयास बोलवते.


आंगणेवाडीच्या जत्रेची अनेक वैशिष्ठ्ये आहेत.. यातल्या प्रत्येक वैशिष्ठ्यात आंगणे हे आडनाव सर्वसमावेशक असच बनलय. आंगणेवाडीत यात्रेच्या दिवशी लाखो भाविक येत असतात. आणि सगळ्यात गंमत म्हणजे हे लाखो भाविक बहुतांशी आंगणे ग्रामस्थांच्याच घरी जेवायला असतात. सर्व आंगणेच्या भक्तीत्वाचा आणि दातृत्वाचा सोहळा या यात्रेदिवशी उभा महाराष्ट्र पाहत असतो. 


दारावर आलेल्या कुणीही भाविकाला पंगतीला बसवल्याशिवाय घरी जावू द्यायचच नाही , आंगणेचा हा प्रेमळ दंडक जगावेगळा असतो.. माझा तर दावा आहे कि महाराष्ट्रातील एकमेव ही जत्रा आहे जिथं अवघे ग्रामस्थ ट्रस्टी बनुन घरोघरी जेवणावळींचा बेत आखतात.. आपला देव दुस-याला कळू नये, दुस-यांच्या नवसाला पाऊ नये याची काळजी घेणा-या स्वार्थी माणसांच्या जगात वावरताना आंगणेवाडीची लोक कडकडीत उपास करुन भाविकांची काळजी घेतात हे फक्त आंगणे कुटूंबियच करु शकतात..


आंगणेवाडीची जत्रा ही जशी माणसांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे ना तशीच ती एका आवाजासाठीही प्रसिद्ध आहे. तो आवाज म्हणजे नरेश आंगणे.. आंगणेवाडीच्या आसमंतात घुमणारा तो आवाज. खरतर आज मिडीयात वावरताना हरीश भिमाणीपासून ते माझा मित्र भुषण करंदीकर यांच्यासारखे आवाजाचे अनेक आयकॉन माझ्या आजुबाजूला वावरत असतात पण तो नरेश आंगणेचा आवाज म्हणजे यात्रेच्या दिवशी साक्षात आकाशवाणी असते.


अर्धातास झाला आणि तो आवाज ऐकू नाही आला ना तर प्रचंड घालमेल होते.. आदल्या रात्रीपासून माईक हाती घेऊन सलग तीन दिवस नॉनस्टॉप भाविकांच्या सोयीसाठी सुसंवादक म्हणून बोलत राहणे हे त्य़ांना या यात्रेत पाहिल्याशिवाय नाही समजणार.. कोकणच्या सगळ्यात मोठ्या यात्रेचा दृष्यपट जिवंत करणा-या डॉक्युमेंटरीचा नरेश आंगणे नावाचा व्हॉईसओव्हर प्रत्येकानं अनुभवायलाच हवा.


आंगणेवाडीची जत्रा ही खरतर श्रद्धाळूंची असते.. हौशा नवशांची असते.. पण ती स्वताला शोधायला निघालेल्या गवशांचीही असते.. अशी खुप कुटूंब असतील कि ज्यांना वर्षभर आंगणेवाडीच्या जत्रेत खरेदी करायचे बेत आखलेले असतात. पण नेमंक जत्रेदिवशी पैसे नसतात.. पण कुणीतरी पाहुणा उभा राहतो. हातात जत्रेचा पॉस म्हणून कुणीतरी एक रक्कम ठेवतो आणि ती गरज पुर्ण होऊन जाते. 


या जत्रेचं अर्थशास्त्र समजून घेतलं ना तर तुम्ही चक्रावून जाल. एक साधारण उदाहरण देतो. जत्रेला सरासरी दहा लाख भाविक येतात. दोन लाख भक्त नाहीत असं काही काळ समजुया उरले आठ लाख.. आठ लाख माणसांच्या हातात कमीत कमी चार खाजाच्या पुड्या असतातच.. एका खाजाची पुडी ही साधारण चाळीस रुपये धरली तर चार पिशव्यांची किमत 160 रुपये झाले. एकशे साठ गुणीले आठ लाख अशी आकडेमोड केली तर येणारं उत्तर 12 कोटी 80 लाख मिळतं.. कदाचित उन्नीस बीस होईल पण या कोट्यावधीच्या उलाढालीकडे अर्थशास्त्र म्हणून अभ्यास कराल तर चक्रावून जाल..


जत्रेच्या निमित्तानं बाजारात येणा-या सगळ्या गोष्टींचा इकॉनॉमिकल स्टडी, क्रिएट होणारा रेव्हन्यु आणि दिल्या जाणा-या इकॉनॉमिकल फॅसिलीटी या सर्वांचा राज्याच्या अर्थधुरीणांनी अभ्यास केला ना तरी खुप होईल.. 


मी खरचं सांगतोय आज देवीच्या कृपेने आणि आंगणे खमके असल्यानं देवीच्या भक्ताना कधीच काहीच कमी पडत नाही. आणि भाविक आजपर्यंत देवीच्या दारातून निराश होऊन माघारी जात नाही. एवढी मोठी गर्दी जमुनही आईच्या दारात आलेलं प्रत्येक लेकरु स्वताच्या परिवारासोबत माघारी फिरत.  


आंगणेवाडीची यात्रा प्रत्येकाच्या आठवणीत असते. आणि त्याच व्याजावर वर्षभर जगण्याचा सोस कमी करायचा आणि पुन्हा नव्यानं नव्या जत्रेच्या आठवणीचं मुद्दल काळजाच्या बॅंकेत जमा करायचं अशी ही दसादशे नफ्याची यात्रा असते.. 


एस्सेलवर्ल्ड, एक्सॉटीकाचे विकएण्डला पर्याय शोधणा-या चाकरमान्यांना अगदी लहानपणापासून या जत्रेनं खुप मौज दिलीय.. आपल्या आईबापाच्या हाताला पकडून जाणा-या चिमुरड्याला पाळण्यात बसायचा मोह असायचा, आज तेच पोरंग बाप झाल्यावर त्याच्या चिमुरड्या लेकरासाठी, पाळणे, मौत का कुवा, गोल गोल गाडी, टॉय ट्रेन म्हणजे एम्युझमेंट पार्क व्हीझीट होऊन जातेय..


दरवर्षी गर्दी वाढत जातेय.. यात्रेसाठी तयार करण्यात आलेली मालवण बस स्थानकाची जागा हळूहळू आंगणेवाडीच्या मंदिरापासून आता दूर सरकत चाललीय. भाविकांच्या प्रेमानं मंदिराचं रुपडं बदलतय. आज अनेक जण विचारतात देवीचा फोटो का काढत नाही. याच उत्तर प्रथा परंपरेत असेल पण माझी वैयक्तित श्रद्धा आहे कि या देवळात येऊन तुम्ही भराडीदेवीचा चेहरा एकदा पाहिला ना कि तो तुमच्या काळजातल्या गाभा-यात घट्ट प्रतिस्थापीत होतो. आणि ज्या काळजात देवी  वसते  ना त्या दैवताचे फोटो, चित्रिकरण अशा गोष्टींसाठी मन आसूसलेलं नसतच मुळी..


जत्रेत पहिलं पाऊल ठेवताच तुमची नजर तुम्हाला ओळखणा-या मित्रसग्यांना शोधत राहते. पटकन एखादा ओळखीचा चेहरा भेटतो.. काळ पुन्हा उभा राहतो.  एक एक करता आठवणींचे चेहरे भेटतात आणि जगणं किती छान आहे हे हे ही गर्दी आत्मभान देऊन जाते.. 


गर्दीबरोबर सरकत सरकत तुम्ही गाभा-यात पोहोचता तेव्हा गाभा-यातला तो चैतन्यमयी प्रकाश, खणानारळाच्या ओटींची मांडलेला जागर, देवीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार हे सगळं रोमारोमात भिनतं.. आयुष्यात तुम्ही कितीही समाधानी असा किवा संकटात असा , गाभा-यातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या मुखातून येणारा 'यंदा दर्शन भारी झाला' हा शब्द आयुष्याचं त्या क्षणापुरता देह सार्थकी लावतो., पण या सगळ्यात सर्वात भाग्यवान कोण असतं ठावूक आहे ती ऑर्कीडची निळी फुलं जी गाभा-यात देवीची सजावट बनून त्या गाभा-यात सदैव देवीसमोर असतात.. 


पुढच्या जन्मावर माझा विश्वास नाही.. पण देवीला एवढंच सांगेन, पुढचा जन्म द्यायचा असला ना तर माणसांचा नको त्या ऑर्कीडच्या फुलांचा दे, एकच दिवसासाठी उमलेन पण दिवसभर देवी भराडीच्या समोर राहीन.. खरच सांगतो मालवणी माणसांन जगावं फुलावं उमलाव आणि उधळून द्यावं स्वताला ते केवळ आंगणेवाडीच्या जत्रेसाठीच..