प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : चर्नीरोड स्टेशनवर रात्री १ वाजता 'पकडो पकडो... जाने मत दो' असा आरडाओरडा सुरू झाला. मी चर्नीरोड स्टेशनला उतरलो आणि नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबल्यावर पाच सहा अल्पवयीन मुलं पळायला लागली. त्यांच्या मागे दोन-तीन वयस्क व्यक्ती पळू लागले... समजायला काहीच येत नव्हतं. 


नेमकं काय झालं... 


समोरून एक व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या दिशेन येत होता. त्याने रेल्वे पोलिसांना हकिगत सांगायला सुरूवात केली. अंधेरीहून चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये सात-आठ जणांचं टोळकं घुसलं. त्याचे अंदाजे वय १२ ते १५ च्या आत असेल. ते या ट्रेनमध्ये स्टंट करत होते. त्याबरोबर कमरेचा पट्टा काढून समोरून येणाऱ्या गाडीतील प्रवाशांना पट्याने मारत होते. त्यामुळे मी ओरडलो असे त्या माणसाने सांगितले. मीही त्याच ठिकाणी होतो. 


सिव्हिलमधील पोलिसांनी सात मुलांना पकडले


लोकलमध्ये हैदोस घालणाऱ्या या टवाळखोर पोरांना घरी परतत असणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यावेळी मला त्या पोलिसांचा खूप अभिमान वाटला. आपली जबाबदारी त्यांनी ड्युटी संपली असतानाही पूर्ण केली. एक एक करून सर्वांना पोलिसांनी पकडून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आणले. 


मुख्य सूत्रधार निसटला... 


पोलिसांनी ज्या सात जणांना पकडून आणले त्यातील 'बाजीराव' असल्याच्या अविर्भावात जो पट्याने नागरिकांना मारत होता, तो मुख्य सूत्रधार निसटला... मग पोलिसांनी आणि त्या नागरिकाने यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. 


मग सुरू सुटण्याचे प्रयत्न... 


सातवी, आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या या मुलांनी दारू प्यायली होती. चांगलेच तर्राट झाले होते. मग पोलिसांनी पकडल्यावर त्यांनी गयावया करण्याचा आणि हातपाय जोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा काय उपयोग झाला नाही. पोलिसांनी आणि ज्या माणसाने आरडा-ओरडा केला, त्याने त्यांना सोडण्यास नकार दिला. म्होरक्याला आणत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. 


कुठून आली ही मुलं...


चौकशीत लक्षात आले, की ही सर्व मुलं अंधेरीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. सिद्धीविनायकला पायी जातो असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. त्यांनी रस्त्यातच कुठेतरी दारू प्यायली. त्यानंतर ते टवाळकी करत अंधेरीवरून थेट चर्चगेटपर्यंत पोहचले. मग त्यांचा रात्री सिद्धिविनायकच्या दर्शनाला जाण्याचा विचार होता. पण हा विचार अविचारात बदलला आणि आपण एखादं समाज विघातक काम करतोय, याची जाणीवही त्यांना झाली नाही. 


रात्री घरी लावला फोन...


त्यातील एका मुलाकडे फोन होता. पोलिसांनी त्या मुलाला फरार मुलाला फोन करायला सांगितला. पण त्याच्याकडे फोन नाही असं एकाने सांगितले. मग मी फोन घेतला आणि त्यातील होम हा नंबर डायल केला आणि समोर विचारले की, 'कोण बोलतंय...?' त्यावेळी समोरून त्या मुलाचा भाऊ बोलत होता. त्याला घडलेला प्रकार सांगितला. 


तोही खूप घाबरला. आपला भाऊ सिद्धीविनायकच्या नावाने असं करेल त्याला खरं वाटत नव्हतं. त्याला आई वडिलांना फोन द्यायला सांगितला. त्याला प्रकरण वाढवायचे नव्हते. तो म्हणाला 'काका सोडा ना त्याला... यापुढे असं करणार नाही'. 


आईचं अजब उत्तर...


त्या मुलाच्या भावाला मी आई वडिलांना फोनवर  बोलविण्यास सांगितले... तो म्हटला की 'आई-वडील झोपले आहेत'. मी म्हटले, 'आता तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडले, घऱी आला नाही तरी ते झोपून राहतील का?' मग त्या भावाने आईला उठवले. आई खडबडून जागी झाली असावी. त्यांनाही हकीकत सांगितली. दहावीतील मुलगा दारू पिऊन रेल्वेत स्टंटबाजी करत होता आणि लोकांना पट्ट्याने मारत होता, असे मी सांगितलं. त्यावर समोरून आई म्हणाली 'अहो... तो दारू पित नाही हो... आणि दारू प्यायला पण असेल पण तो कधी दारू पिऊन घरी आला नाही'. आता काय करायचं... आई घाबरली असेल म्हणून मी तिने असे अजब उत्तर दिलं असेल असं मला वाटलं. 


पोलिसांचा दया भाव


चर्नी रोड ते मरीन लाइन्स पळत ज्यांनी त्या मुलांना पकडले त्या पोलिसांनी मुलं लहान असल्याचं पाहून दया भाव दाखवत त्यांना ताकीद देऊन सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांच्या घरच्यांना हा प्रकार माहीत झाला. याचे पोलिसांना समाधान होते. पोलिसांनी सर्व मुलांना ताकीद देऊन सोडून दिले. त्या जागृक नागरिकाचे आभार मानले आणि पुन्हा आपल्या ड्युटीला रूजू झाले. 


या सर्व प्रकारात ऑफिसमधून १२ वाजता निघालेल्या मला सासरवाडीला पोहचायला १.३० वाजले. पण या सर्व प्रकाराचा साक्षीदार असताना लक्षात आले, की पालक आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यात कमी पडतात. तसेच ते कोणत्या संगतीला लागले? ते कोणासोबत आहेत? काय करताहेत? याची चौकशी करण्याचाही वेळ त्यांच्याकडे नाही. ही परिस्थिती मुंबईतीलच नाही तर छोट्या गावाकडेही थोड्याफार प्रमाणात आहे. मीदेखील एका छोट्या गावातून आलो आहे. तेथील परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही, हे प्रकर्षाने सांगावेसे वाटते... 


गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळे यांच्या सैराटवर खूप टीका होत आहे. सैराट' पाहून मुलं बिघडतील, असे चित्रपट काढायला नको, अशी आवई काही फेसबूकवरील फेक माणसांकडून उठवली जात आहे.  पण अंधेेरीतील या मुलांनी एखादा चित्रपट पाहून असे कृत्य केले असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे समाजात अशा विकृती, प्रवृत्ती आपल्या पदोपदी दिसत असतात. त्या काही चित्रपट पाहून होत नाही, समाजातील इतर घटकही जबाबदार असतात. ते आपण लक्षात घेतले पाहिजे.... आणखी काय सांगावेे...