अमोल परांजपे, झी 24 तास, मुंबई : सकाळपासूनच गोकुळात गडबड उडाली होती. आज गोपाळांच्या लाडक्या कान्हाचा वाढदिवस. त्यामुळे सगळ्या गावात त्याच्यासाठी अन् त्याच्या मित्रमंडळींसाठी उंचच उंच दहिहंड्या बांधण्यात सगळे गोकुळवासी दंग झाले होते... साधारणतः 10च्या सुमारास यशोदामातेनं कृष्णाला उठवण्याचा 10वा किंवा बारावा प्रयत्न केला आणि आळोखे-पिळोखे देत अखेर कन्हैय्या उठला.... मोबाईलवर वासुदेव, देवकी, राधा, पेंद्या यांचे हॅपी बर्थ-डे करणारे SMS आलेच होते. त्यांना रिप्लाय करून कृष्ण फ्रेश झाला आणि आपल्या मित्रांना गोळा करायला बाहेर पडला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकडे गोकुळवासियांची गडबड सुरू होतीच... नंदमहाराज भडकले होते. गावात अनेक ठिकाणी 20 फुटांपेक्षा उंच हंड्या बांधल्यामुळे महाराजांचा पारा चढला होता. त्यामुळे गावातल्या अनेक मंडळांनी हंडी खाली आणली... मात्र गोकुळ नवनिर्माण मंडळानं मात्र महाराजांचं ऐकायचं नाही, असं ठरवलं होतं. या मंडळाचा कायम चिडल्यासारखा दिसणारा, टिळा लावणारा अध्यक्ष तावातावानं नंद महाराजांशी वाद घालतच होता... महाराजांनी त्याला शिक्षा करण्याची धमकीही दिली. पण तो ऐकेना... त्याच्या मते कन्हैय्याला वीस फुटांपेक्षा जास्त उंचीची हंडी हवीये, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? महाराजांना सगळ्यात वरच्या थरावर जाणाऱ्या कृष्णाची आणि त्याच्या मित्रांची काळजी वाटत होती... यावरून बराच वाद झाला... अखेर त्या अध्यक्षाला तंबी देऊन महाराज तिथून निघून गेले.


हळूहळू उत्सवाला रंग चढत होता. हेल्मेट-बिल्मेट घालून कन्हैय्या पण हंड्या फोडायला सज्ज झाला होता. पेद्यादी त्याचं बाळगोपाळ मित्रमंडळही कान्हाच्या फोटोचे टीशर्ट घालून तयार होत होतं... अखेर हंड्या फोडणाऱ्यांची टोळी तयार झाली आणि चौकाचौकात लागलेल्या हंड्या फोडायला निघाली... त्या हंड्यांमध्ये लपवलेलं लोणी खाण्यासाठी गोविंदा आसुरला होता. पण आज त्याला विचित्रच अनुभव येत होता. त्याच्या मित्रांनी थरांवर थर लावले आणि कान्हा हंडीच्या जवळ पोहोचला... पण त्याला कोणी हंडी फोडूच देईना. कान्हा हंडी फोडायला जाणार इतक्यात माईकवरून आयोजकांनी त्याला थांबवलं... हंडी फोडू नको... फक्त सलामी दे ! सलामी द्यायची म्हणजे काय करायचं, हे कृष्णाला कळे ना ! मग खालच्या थरावरून पेंद्यानं ओरडून सांगितलं की, अरे बाबा... वरच्या थरावर उभा राहून फक्त सलाम ठोक ! कृष्ण म्हणाला कशाबद्दल सलाम... त्यावर दुसऱ्याच कुणीतरी उत्तर दिलं, अरे बाबा... लाखांचं बक्षिस लावल्याबद्दल सलाम कर. आपली संस्कृती जोपासल्याबद्दल सलाम कर...


बिच्चारा कान्हा ! इतक्या उंचीवर जाऊन त्याला लोणी खाताच आलं नाही... त्यापेक्षा आपल्या वाड्यामध्ये शिंकाळ्यावर लटकवलेल्या हंडीतलं लोणी खाल्लं असतं तर बरं झालं असतं, असं त्याला वाटलं... केवळ इथंच नाही... तर चौका-चौकात, गल्लोगल्ली त्याला कुणीच हंडी फोडू देई ना... केवळ सलाम ठोकून त्याला खाली उतरावं लागत होतं... कन्हैय्याची अखेरची आशा होती गोकूळ नवनिर्माण मंडळाकडून. तिथं तरी आपल्याला लोणी खायला मिळेल, असं वाटत होतं...


एकेक चौक पार करत कृष्णाच्या गोविंदांची माखन (उपाशी) सेना नवनिर्माण मैदानात पोहोचली. तिथं बघितलं तर उंचच उंच हंडी बांधली होती. मंडळाचा अध्यक्ष माईकमधून तावातावानं बोलत होता... म्हणजे, तो नुसतंच बोलत होता, पण ते सवयीनं तावातावाचं झालं होतं... कृष्णाच्या टोळीचं त्यानं हसत हसत स्वागत केलं आणि मराठी संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी नंद महाराजांचा आदेश मोडून 20 फूटांपेक्षा वर लावलेली हंडी फोडायचं आवाहन केलं... कन्हैय्या बिचारा हैराण झाला... आपलं नाव आहे श्रीकृष्ण वासुदेव यादव... किंवा फार फार तर श्रीकृष्ण नंद... यामध्ये मराठी संस्कृती कुठे आली त्याला काही कळे ना ! आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही, असं म्हणत त्यानं हेल्मेट घातलं आणि इथं तरी लोणी खायला मिळणार का, या विवंचनेत थर रचायला सुरूवात केली...