दिपाली जगताप, झी मीडिया, मुंबई :  ‘मला पहायला मुलगा आला होता. त्याच्या आईने मला लिहून दाखवायला सांगितले. माझं डोकंच फिरलं. मग माझ्या आईने सांगितले, ‘अहो ती लेख लिहिते. तिच्या नावासहीत ते वर्तमानपत्रात छापून येतात आणि तुम्ही तिला लिहून दाखवायला काय सांगता?’ हा अनुभव आहे सध्या एका प्रतिष्ठित न्यूज चॅनेलमध्ये पॉलिटिकल बीट सांभाळणा-या महिला रिपोर्टरचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
हा झाला केवळ एक किस्सा... पण कमी अधिक फरकानं महिला रिपोर्टरच्या वाट्याला असेच अनुभव येतात. पत्रकारिता हे करिअर निवडल्यावर रिपोर्टर म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंत मुलगी साधारण लग्नाच्या वयाची झालेली असते. मग ‘तुझे हट्ट आम्ही पुरवले, आता लग्नाचे बघ’ असे सांगत घरातले मुलीसाठी (महिला रिपोर्टरसाठी) स्थळं बघायला सुरुवात करतात. कोणत्याही रिपोर्टर मुलीला पाहुणे पाहायला आल्यानंतर काय घडतं, त्याचे काही मजेशीर, काही गंभीर आणि काही वास्तवदर्शी मुद्दे मांडण्याचा हा प्रयत्न....


मुलगी न्यूज चॅनेलमध्ये रिपोर्टर आहे, असे ऐकल्यावर बघायला आलेल्या मुलाच्या  कुटुंबामध्ये उत्सुकता दिसते. काही सासू-सासरे कौतुकानेही पाहतात. पण रिपोर्टर असलेल्या मुलीच्या कामावरून घरी येण्या-जाण्याच्या वेळा समजल्यानंतर फराळाचा घास घशातच अडकतो. हल्ली सगळीकडेच शिफ्टमध्ये काम चालते. पण न्यूज चॅनेलची शिफ्ट म्हटलं की सकाळी सहाला सुरु होते... आणि ती संध्याकाळी किती वाजता संपेल, याची काहीच गॅरंटी नाही. जनरल शिफ्ट सकाळी दहा वाजता सुरु होते. त्यात संध्याकाळचा एखादा इव्हेंट, लाईव्ह असेल तरी घरी डायरेक्ट जेवायलाच जायचं. मग ह्या अशा मुली जेवण कधी बनवणार? असा स्वाभाविक प्रश्न मुलाकडच्यांना पडतो. बरं घरकामाला बाई लावली तरी स्वयंपाकही बाईच करणार? मग सूनबाई काय करणार? असाही स्वाभाविक प्रश्न असतोच. सकाळचा एकवेळचा स्वयंपाक तरी जमेल का ? असे रिपोर्टर मुलीला विचारले तर ती मनांत विचार करते, स्टोरीचे लाईन अप करु? पेपर वाचू? ऑफिसचा कॉन्फरन्स कॉल घेऊ की स्वयंपाक करु? मग ती म्हणते, चहा नाष्टा करु शकेन. स्वयंपाक जरा कठीण आहे. आता ही परिस्थिती असल्यावर मुलाकडच्यांचे उत्तर काय असणार, हे वेगळे सांगायलाच नको.


त्यात मुलगी रिपोर्टर म्हणजे पत्रकार.. तिचे विचार हमखास इतरांपेक्षा वेगळेच. पत्रकारिता आणि रिपोर्टिंग हा स्वभावाचा भाग झाला. तिच्या विचारात स्त्री पुरुष समानता ठासून भरलेली. परंपरेचा दिखावा नाही. हुंडा कुठल्याही मार्गाने मागायची सोय नाही. अशा एक ना अनेक गोष्टी. त्यात मुलाकडचे पहायला येणार, वरुन खालपर्यंत जर सासूबाई किंवा मुलाने पाहिले तरी तिची तळपायाची आग मस्तकात जाणार. त्यात पाहुण्यांनी प्रश्न विचारले तर ती मनात विचार करणार. आता हे माझी अक्कल काढणार. मी तिकडे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारते आणि आता मला ह्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार? घरातले थोडे फार काम ठीक आहे. पण अगदी ह्यांच्या हातात डबा, रुमाल, टॉवेल, चहा, नाष्टा सगळं द्या. मग हा काय करणार ? आणि हे सगळं करत बसले तर स्टोरी लाईन अप, फोनाफोनी, न्यूजपेपर वाचन, न्यूज चॅनेल पाहणं, किमान हेडलाईन तरी पाहणं. कसं करणार हे सगळं... आणि हे सगळं जर निमूटपणे सहन केलं तर स्पर्धेच्या जगात रिपोर्टिंग यशस्वीपणे करणं अशक्यच आहे. रिपोर्टिंग करते हे सांगितल्यावर अनेकदा विचारले जाते किती वर्ष रिपोर्टिंग करणार? रिपोर्टिंगला काही पर्याय आहे का? यापेक्षा बँकेची परीक्षा दिली तर जास्त पगार मिळेल.


या सर्व परिस्थितीवर मात करत, निदान मुलगा तरी समजुतदार आहे असे मानून लग्न केले तरी ती तारेवरची कसरत... मनस्ताप, वाद विवाद याला आमंत्रण देण्यासारखेच. कारण सुरुवातीला आपली सून टिव्हीवर दिसते. बड्या नेत्यांच्या, सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते, जिथे जातो तिथे तिची वट असते. शेजारी पाजारी, नातेवाईक सगळेच तिचं नाव काढतात. सुरुवातीला अशा सर्व बाबींचं कौतुक होत असले तरी नव्याची नवलाई संपल्यावर सूनेचे गोडवेही संपतात.


मग टिव्हीवर दिसणारी हीच सून संसार कसा नीट करु शकत नाही, इथपासून ते अनेक निगेटिव्ह गोष्टींची बाराखडी गिरवली जाते. पाहुणे घरी आल्यावर रिपोर्टर मॅडम कशा घरी नसतात, सणासुदीला त्यांचे दर्शन टिव्हीवरच घ्यावे लागते, कुठे लग्नकार्याला जायचे म्हटल्यावर रिपोर्टर सुनेची सुट्टी ऐनवेळी रद्द झाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. अख्ख्या देशाला १५ ऑगस्टची सुट्टी असते आणि ही सकाळी मंत्रालयाच्या बाहेर झेंडावंदन करायला जाते. घरी असलीच तर त्यांच्या सतत चालू असलेल्या फोनकडे पाहून संताप आल्याशिवाय राहत नाही. सूनबाई अशा वागतात जणू अख्या देशाचा भार यांच्यावरच सोपवला आहे. असा सर्व उद्धार पद्धतशीरपणे वेळोवेळी केला जातो. त्यात माहेराकडून फोन आला तर लग्नाआधी ठिक होते गं आता तुझे लग्न झाले आहे असा सल्ला न विसरता आम्हाला दिला जातो.
 
 
लग्नाच्या आधी असो वा लग्नानंतर, कोणत्याही मुलीसाठी रिपोर्टींगचे आव्हान सोपे नसते. बुम हातात घेवून लाईव्हसाठी दिवाळी पहाटला ती उभी असते तेव्हा तिलाही नटून थटून
आपल्या नव-यासोबत त्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी व्हावेसे वाटते.
तुम्ही सकाळचा स्वयंपाक करता, घरातली कामं आवरता आणि दुपारी जेव्हा निवांत झोप काढता तेव्हा त्यांना उन्हातान्हात डब्बा खाण्यासाठी जागा शोधावी लागते. जेव्हा लग्नकार्यात तुम्ही भरजरी साडी, दागिने मिरवत असतां तेव्हा फिल्डवर त्यांना अपघातात किंवा आगीत जखमी  झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये जावून पाहावे लागते आणि ते जगालाही दाखवावे लागते. तुम्ही संध्याकाळी टिव्हीवर जेव्हा फॅमिली ड्रामा पाहत असता तेव्हा त्या कुठल्यातरी मंत्र्याला घोटाळ्याचा जाब विचारत असतात. पीरियड्सच्या त्या चार दिवसांत तुम्ही घरी राहून विशेष आराम करता पण ‘त्या’ दिवसातंही त्यांना फिल्डवर स्वच्छ शौचालये शोधावे लागतात. त्यांचा मित्र परिवार जेव्हा नाईट आऊट आणि बाहेर जाण्याचा प्लॅन करतो तेव्हा नेमके त्यांना आउटडोअर शूटला जावून कुपोषित बालकांची परिस्थिती पहावी लागते. ती पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले तरी निरपेक्ष भावाने कुपोषणाचे सत्य तुमच्यापर्यंत पोहचवावे लागते. दिवसभर तुम्ही त्या घरी नसल्याची दूषणं देता, तेव्हा कुठेतरी, कोणत्यातरी गल्लीत, शाळेत, महापालिकेत, मंत्रालयात, सेलिब्रीटींच्या घराबाहेर त्या बातमी शोधत असतात. जगभरात घडणा-या घडामोडी तुम्हाला दाखवून पत्रकार समाजात जागृती निर्माण करत असतो.


या भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही म्हणाल कशाला करायची मग अशी नोकरी ? मुलींनी  स्वत:ला हा त्रास कशाला करुन घ्यायचा ? तुमचा प्रश्न बरोबर आहे पण हे काम त्यांना आवडते. किचनमध्ये त्यांचे मन कमी रमते पण जिथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार झालाय तो जगासमोर आणण्यात त्यांना समाधान मिळते. तुमचा स्वयंपाक चविष्ट झालाय हे पाहुण्यांनी सांगितल्यावर जो आनंद आणि समाधान तुमच्या चेह-यांवर दिसतो तोच त्यांना त्यांच्या बातमीची दखल जनतेने घेतल्यावर मिळतो. यात केवळ आवडी-निवडी वेगळ्या असल्याचा काय तो फरक. तुम्ही जसे तुमच्या कुटुंबावर प्रेम करता तसेच तेही त्यांच्या कुटुंबावर करतात. अनोळखी माणसांसाठी जर ते इतके झटतात तर त्यांच्या जीवाभावाच्या माणसांसाठी का नाही झटणार? फक्त गरज आहे ते अशा मुलींवर, सुनांवर विश्वास ठेवण्याची, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची....
 
(रिपोर्टर म्हणून फिल्डवर काम करणा-या सर्व महिला रिपोर्टर्सना समर्पित)
 
 
 न्यूजचॅनेल आणि न्यूजपेपरमध्ये काम करणा-या महिला रिपोर्टर्सचे काही अनुभव : (बाॅक्समध्ये टाकावेत) 
 
‘लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अगदी प्रत्येक सणावाराला, कार्यक्रमांना आमंत्रण यायचे. पण प्रत्येकवेळी वेळ नाही, व्यस्त आहे असे सांगितल्यावर काही वर्षांनी नातेवाईकांनी कार्यक्रमांना बोलावणेच बंद केले. त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना झालेली मुले, त्यांना झालेला कँसरसारखा आजारही उशिराने कळू लागला. याचा खूप त्रास होतो. आपण कार्यक्रमांना जमेल तसे जातो पण काही वेळानंतर आपल्याला बोलावणेही बंद होते हे फारच त्रासदायक आहे.’
 
 
 
‘तू गुजरातला दंगल कव्हर करायला गेली होती. बाप रे एवढी रिस्क... किती वर्षं करणार हे काम? चांगली आरामाची नोकरी शोध.. असा फुक्कटचा सल्ला देणारे बरेच असतात. आता माझे आई बाबा माझ्या कामाचे स्वरुप स्वीकारेल असा मुलगा शोधत आहेत. पण हे खूप कठीण काम वाटत आहे. मुलगा शोधायला किती वर्ष जातील माहित नाही.’


‘मुलगी मुलापेक्षा जास्त कमवते. त्यात ती टिव्हीवर दिसते. म्हणजे माझ्या मुलाच्या डोक्यावर बसून नाचेल.’


‘लग्नाची बोलणी सुरु होती तेव्हा हुंडा मागितला. मनात विचार आला की गेल्या आठवड्यातच हुंड्यामुळे बळी गेलेल्या महिलेची स्टोरी केली आणि आता माझ्या लग्नासाठी मी हुंडा द्यायचा ? हे शक्य नव्हते म्हणून मी नकार दिला.’



‘इकडे कॉपी फाईल करायची डेडलाईन संपत असते आणि दुसरीकडे वेळेत येणार ना?  स्वयंपाक कोण करणार आहे आजचा ? अशा प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतात.’


‘मला बघायला आलेल्या मुलाला मी बाहेर भेटायला बोलवले. तो म्हणाला, ‘तू टीव्हीवर वगैरे दिसतेस, हे छान आहे. पण मी ऐकले होते, ‘टीव्हीवर दिसणा-या मुली ह्या जनरली गो-याच असतात. म्हणजे दिसायला तशा सुंदर असतात’. मग मी म्हणाले ‘मी रिपोर्टर आहे’. कदाचित मी तुला आता जितकी बरी दिसत आहे तितकी भविष्यात कदाचित दिसणार नाही’  


‘तू मुंबईत पत्रकार म्हणून कशीही राहा, पण गावी आल्यावर तुझा पदर खाली पडणार नाही याची काळजी घे! गावी साडीच नेसावी लागेल’. ‘मी माझ्या नव-याला म्हटलं म्हणजे मुंबईत रिपोर्टींग करत फिरताना महिलांना समानता वैगरेच्या बातम्या करायच्या आणि आपल्या घरात गपगुमान सर्व सहन करायचे.’