(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे. ज्या देशांजवळ जास्त पाणबुड्या त्या देशांची नौदलाची शक्ती अधिक, असे समीकरण आहे. पाणबुडी हे पाण्याखालचे जहाज असून, त्या क्षेत्रात भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. ६०० टन वजन, ३५०० किलोमीटर रेंज, पाण्याच्या खालून कोणत्याही विमानाचा वेध घेण्याची क्षमता, के-१५, बीओ-५ शॉर्ट रेंज मिसाईलने ७०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता, के-४ बॅलिस्टिक मिसाईलने युक्त आणि समुद्राच्या तळाखालून अण्वस्त्र डागण्याची शक्ती ही आहेत भारताच्या नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज असलेल्या पहिली अण्वस्त्रसज्ज पाणबुडी ‘आयएनएस-अरिहंत’ची ही काही वैशिष्ट्ये आहे. जागतिक शक्तींच्या नजरेपासून अरिहंतला आजवर दूरच ठेवण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अणुउर्जेवर चालत असून बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्राने सज्ज


भारताने यापूर्वी अनेक लढाऊ नौका आणि पाणबुड्या स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार केल्या आहेत. त्या श्रेणीतील आयएनएस अरिहंत या पाणबुडीचे वैशिष्ट्य आहे की, ही पाणबुडी अणुऊर्जेवर चालणारी आहे. यात जगातील अत्याधुनिक प्रणाली बसविलेल्या आहेत. अरिहंत म्हणजे 'शत्रूंचा सर्वनाश'. म्हणून या पाणबुडीला अरिहंत हे नाव देण्यात आले आहे. या पाणबुडीची क्षमता ८३ मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीची आहे. या पाणबुडीवर ३,५०० किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात येणार आहेत. शिवाय पाण्याच्या तरंगावरून शोध घेणारी अत्याधुनिक सोनार प्रणाली, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रसंभार आहे. एल ऍण्ड टी, टाटा पॉवर, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासह देशातील अनेक उद्योगांनी या पाणबुडीला विविध तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री देण्यात हातभार लावला आहे. 


अरिहंत या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ 'शत्रू विनाशक' असा असून ही पाणबुडी भारताच्या 'अरिहंत' वर्गाची प्रमुख नौका असेल. सहा हजार टन वजनाच्या या पाणबुडीची निर्मिती अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल (एटीव्ही) प्रकल्पाअंतर्गत विशाखापट्टणम येथील जहाजबांधणी केंद्रात झाली. या पाणबुडीची अणुभट्टी कार्यान्वित झाल्याने भारत आण्विक पाणबुडीच्या डिझाइन, बांधकाम व संचालनात आत्मनिर्भर झाला असून तो अमेरिका, रशिया, फ्रान्स इत्यादी पाच राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. अरिहंतवर्गाची पाणबुडी बऱ्याच प्रमाणात 'अकुला-१' या वर्गातील रशियन पाणबुड्यांसारखी असल्याने यावर काम करणाऱ्या खलाशांना 'आयएनएस चक्र' या अकुलावर्गातील पाणबुडीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे.


अरिहंत पाणबुडीत स्वदेशी बनावटीच्या भागांचा वाटा ४० टक्के


गेल्या अनेक वर्षांपासून या पाणबुडीच्या निर्मितीचे काम सुरू होते. २००६ साली या पाणबुडीची समुद्रात पहिली चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर विविध क्षेपणास्त्रे आणि यंत्रप्रणालींच्या चाचण्या सुरू झाल्या. आतापर्यंतच्या सर्व चाचण्या या यशस्वी झाल्या असून कालानुरूप नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचाही अंतर्भाव यात करण्यात आला आहेत. अशा आणखी सहा अरिहंत पाणबुड्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भारताजवळ अरिहंत ही अणुऊर्जेवर चालणारी दुसरी पाणबुडी आहे. आयएनएस चक्र ही पाणबुडी आपण रशियाकडून २०१२ साली दहा वर्षांच्या भाडेतत्वावर घेतली आहे. ही लीज २०२२ साली संपेल. आयएनएस चक्र ही अरिहंतपेक्षा मोठी पाणबुडी आहे. सध्याच्या अरिहंत पाणबुडीत स्वदेशी बनावटीच्या भागांचा वाटा ४० टक्केच असला तरी पुढील पाणबुड्यांमध्ये हे प्रमाण वाढेल आणि हा वाटा ७० टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. पाणबुडीची डिजिटल नियंत्रण प्रणाली पूर्ण स्वदेशी आहे.


भारताने स्वदेशी निर्माणावर भर देण्यास प्रारंभ केला आहे. आधीच्या सरकारने शस्त्रसंभाराच्या आयातीवर नको तेवढा भर दिल्यामुळे  भारत परदेशांकडून लुबाडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा नारा स्वदेशी निर्मितीसाठी आहे. यामुळे स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल, नवनवीन तंत्रज्ञान भारतात येईल, सोबतच रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील, हा यामागचा उदात्त हेतू आहे. अरिहंतचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास टाटा आणि वालचंदनगर या दोन मोठ्या स्वदेशी उद्योगांचा मोठा सहभाग अरिहंतमध्ये आहे. शिवाय अशा आणखी अकरा विविध स्वदेशी कंपन्यांचाही हातभार यात लागला आहे. 


आणखी सहा विमानवाहू नौका बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम


केवळ पाणबुड्याच नव्हे, तर विमानवाहू जहाजांच्या बांधणीचा कार्यक्रमही पूर्ण वेगाने सुरू आहे. आयएनएस विक्रमादित्यच्या सोबतीला आयएनएस विक्रांत २०१८ साली नौदलात सामील होणार आहे. अशा आणखी सहा विमानवाहू नौका बांधण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भारताने हाती घेतला आहे. 
सध्या नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या दोन विमानवाहू नौकांसह, विध्वंसक बोटी व अन्य सर्व बोटी मिळून एकूण २१३ नौका आणि २१९ विमाने आहेत. आगामी तीन वर्षांत विविध श्रेणीच्या आणखी दीडशे नौका आणि तीनशे विमानांचा ताफा नौदलात सामील करण्याची योजना आहे. भारताची संरक्षणावरील तरतूद चीनपेक्षा फार कमी आहे. आशिया खंडात अद्याप चीनकडेही त्यांची स्वतःची आण्विक पाणबुडी आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताची आण्विक पाणबुडी कार्यरत झाल्यास नौदलाचे सामर्थ्य दुणावेल. चीनने आपल्या नाविक दलात सातत्याने भर घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याला प्रत्युतर म्हणुन आपले नौदल वाढवणे जरुरी आहे.


न्युक्लियर ट्राइअॅड  पूर्णत्वास नेण्यात मोठे पाऊल


आयएनएस अरिहंतच्या रूपाने भारताने आपले आण्विक त्रिकूट (न्युक्लियर ट्राइअॅड) पूर्णत्वास नेण्यात मोठे पाऊल उचलले आहे. आण्विक त्रिकूट म्हणजे जमिनीवरून, हवेतून व पाण्यातून अण्वस्त्र मारा करण्याची क्षमता. आत्तापर्यंत जी माहिती आपल्या हाती आली आहे, त्यानुसार अणुभट्टी कार्यान्वित झाल्यानंतर आता या युद्धनौकेला संरक्षण (सामग्री) संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ व इतर राष्ट्रीय विभाग लवकरच क्षेपणास्त्र व इतर सामग्रीने परिपूर्ण सज्ज करून नौदलात तैनात करण्यात गुंतलेले आहे. अरिहंत व त्यामागून येणाऱ्या पाणबुड्या यामुळे भारतीय नौदल हे जगातील एक सक्षम नौदल म्हणून गणले जाईल.
आयएनएस अरिहंत पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर इतर पाणबुड्यांबरोबर 'प्रतिबंधात्मक टेहेळणी'च्या (डेटेरन्ट पॅट्रोल) कामगिरीवर तिला पाठवले जाईल. यामध्ये अरिहंत पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहून अविरत कार्यरत राहील. कोणत्याही आणीबाणीला , आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असेल. यामागचा मुख्य हेतू शत्रूराष्ट्राला आपल्या देशावर पहिल्याने अणुहल्ला (न्युक्लियर फर्स्ट स्ट्राइक) चढवण्यापासून रोखणे, परावृत्त करणे हा आहे. 


'आण्विक त्रिकुटा' चा शत्रूच्या हल्ल्यापासून यशस्वी बचाव


पाण्याखाली राहून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करता येणे हा 'आण्विक त्रिकुटा' चा सगळ्यात विश्वासार्ह व शत्रूच्या हल्ल्यापासून यशस्वी बचाव करणारा युद्धतंत्राचा भाग समजला जातो. सध्याच्या स्थितीत अशा प्रकारच्या बचावाची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे; कारण आपल्या देशाने अण्वस्त्रांच्या उपयोगासंदर्भात 'नो फर्स्ट यूज' हा सिद्धान्त प्रमाण मानला आहे. भारताची नीती ही युद्धखोर किंवा आक्रमक नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या घडामोडी पाहता आपण आक्रमणाचे तत्त्व मानत नसलो तरी सक्षम बचावाचे आणि शत्रूच्या आक्रमणाला प्रतिबंध करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान आपल्यापाशी असण्यास आणि त्याचा काळानुसार विस्तार आणि विकास करण्यास पर्याय नाही. आयएनएस अरिहंत व त्यामागून येणाऱ्या पाणबुड्या यामुळे भारतीय नौदल हे जगातील एक सक्षम नौदल म्हणून गणले जाईल. देशाच्या संरक्षणासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.