सचिन तायडे, पब्लिक स्पिकर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(sachingtayade@gmail.com)


कोपर्डी... दीड दोन हजार वस्तीचं गाव... याचाच अर्थ हाही की जवळपास जो तो एकामेकांना किमान चेहऱ्यानं का होईना सहज ओळखू शकतो... की ही अमूक अमूक व्यक्ती आपल्या गावातलीच आहे म्हणून... त्या दिवशी घरी परतताना त्या  'छकूलीला' (घरात सारेच जन याच नावानं हाक द्यायचे) ते नराधम अनोळखी असतील असं नाही. रस्त्याने येता जाता कधी तरी, केव्हा तरी त्यांची ती घाण नजर तिच्यावरून गेल्याचं तिला कदाचित लक्षात आलंही असेल. तेव्हा ती घाबरलीही असेल, मात्र कदाचीत तिला केव्हाच वाटलं नसेल की केव्हातरी या अशा काळ्या दिवसाला सामोरं जावं लागेल. घरापासून काहीशे मीटर अंतरावर तिला त्या राक्षसांनी अडवलं त्यावेळी कीती धस्स झालं असेल तिला. मात्र तरीही इतकं क्रूर, काही वेळात आपल्यासोबत घडेल याचा तीला अंदाजही आला नसेल. त्यांनी तिला उचलून नेलं. तोंडात बोळा कोंबला. मग त्या नराधमांनी सारचं केलं जे जे त्यांच्या अमानुष मानसिकतेला करावंसं वाटलं... वाट्टेल तिथं तिच्या शरीराचे त्यांनी लचके तोडले. ती जीवाच्या आकांतानं ओरडण्याचा प्रयत्नही करत असेल. जवळच आपले सगळे घरचे लोक राहतात मात्र कुणालाच तिला बोलवता येत नाही याने तर ती अधिकच भेदरून गेली असेल. मदतीसाठी घरातल्या प्रत्येकाचे चेहरेही तिच्या डोळ्यासमोर त्यावेळी येत असतील मात्र तिच्या डोळ्यात पाण्याशिवाय आणि हतबलतेशिवाय कदाचित काही उरलंही नसेल. तीचं रडणं, तीचं जीवाची भीक मागणं, तीचं हात जोडणं काहीच त्या राक्षसांच्या मनाला पाझर फोडणारं नव्हतं. तीचे हात तोडताना त्यांना त्यांची सुद्धा आई-बहीन आठवली नसेल का? अतिषय क्रूरतेनं, अमानुषपणाणं त्यांनी शेवटी तिच्यावर अत्याचार करत तिला संपवलं… कुणालाच कल्पना नव्हती की छकूलीचं असं काहीतरी होईल म्हणून... 


संस्कार, संस्कृती आणि वास्तव


दुदैवानं सांगावं लागतं की या देशाला स्त्री अत्याचार काय नवीन नाहीत. स्त्रियांएवढं शोषण या देशात अस्पृश्यांनंतर कदाचित इतर कुणाचं झालं असेल... शारीरिक शोषण किंवा बलात्कारसुद्धा या देशाला आश्चर्यजनक किंवा फार धक्कादायक बाब नाही... अगदी देशाची फाळणी झाली तेव्हा सुद्धा तिकडच्यांनी व इकडच्यांनीही आपली धार्मिक, राजकीय व आर्थिक भडास काढण्यासाठी सर्वात प्रथम स्त्रीलाच टार्गेट केलं होतं. फाळणी दरम्यान लाख्खो महिलांवर बलात्कार करण्यात आले हे सारं सरकारच्या दफ्तरी नोंद आहे. इथली सो कॉल्ड महान संस्कृती एकीकडे स्त्रीला देवत्वाचं स्वरूप मानते व घरात मुलगी जन्माला आली की कित्येकांचे चेहरे काळवंडतात. काही जण तर आधीच अशा स्त्री भ्रूनाच्या खूनाचा चोख बंदोबस्त लावतात. कित्येक घरात नव्यानं आलेली सून अनेकांना घरात आणलेली गुलाम वाटते तर काहींना ऑफीसमधे आपल्या हाताखाली काम करणारी स्त्री म्हणजे चालून आलेली संधी वाटायला लागते… पांढरे कपडे घालून रंगबेरंगी, भिभत्स अश्लिल क्लीप्स विधानसभेत बसून पाहणारे राजकारणातल्या आपल्या सहकारणीकडे कोणत्या नजरेनं पाहत असतील. पोरीच्या वयाच्या मुलींकडे वरून खाली पाहणारे काय कमी नाहीत. बसमधे शेजारी बसलेल्या मुलीला नको तेवढे नको तिथे स्पर्श करू पाहणारे थेरडेसुद्धा याच समाजात आहेत… शासकीय आकडेवारी पाहता महाराष्ट्रात अशात, म्हणजेच या जूनपर्य़ंत २०६९ बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यात आलेत. तर दोन वर्षाआधी सरकारतर्फे लोकसभेत सांगण्यात आलं होतं की देशातील उच्च न्यायालयांमध्ये अजूनही तब्बल २३ हजार ७९२ पेक्षाही अधिक बलात्काराचे खटले अजूनही प्रलंबीत आहेत. कीती भयानक आहे हे सारं...


कोपर्डी : खंत, दुर्देवं आणि राजकारण


कोपर्डीची घटना घडल्यावर काही तासांत या अत्याचार व खूनाचे मॅसेजेस व्हाट्सअप व फेसबूकवर पळायला लागले. काही  मॅसेजेस नक्कीच काळजीचे, दुःख व्यक्त करणारे होते तर काहींमधे लगेचच जातीय दुर्गंधी पसरवण्यात आलेली होती. याचाही दुर्दैवी कळस हा होता की मागच्या चार दिवसात तर व्हॉटसअप वर त्या आठवीत शिकणाऱ्या निष्पाप मुलीचे फोटोसुद्धा व्हायरल करण्यात आले. राज्यभर याचे पडसाद उमटलेत. मात्र यात पुन्हा जात हा मुद्दा केंद्रभागी आल्याचं पुन्हा निदर्शनास येतंय. हेही नेहमीचंच झालंय. दलिताच्या मुलीवर बलात्कार झाला की रस्त्यावर दलितांचेच मोर्चे निघतात अन् मराठ्याच्या मुलीवर असा अत्याचार झाल्यावर केवळ मराठा संघटनाच रस्त्यावर उतरताना दिसतात. कधीतरी जातविरहीत समाज म्हणून आपण ती आपलीही लेक होती असं मानून रस्त्यावर कधी उतरणार आहोत. मुळात आता शेवटी उरलेले गुन्हेगार लवकर पकडले जावून, त्या नराधमांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर दिली गेली पाहिजे हीच भावना महत्वाची ठरावी.


स्त्रीला मिळणारा हीन दर्जा


स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान किंवा स्थानच न देणाऱ्या या देशात एकीकडे स्त्रियांच्या सक्षमीकरणाची (वूमन एम्पॉवरमेंटची) भाषणं राजकीय पटलांवर सुरू असताना कीती राजकीय पक्ष किती महिलांना निवडणुकीत तिकीट देतात हे जरा तपासून पाहीलं पाहिजे. लोणचं-चटनी सारखं तोंडाला लावायला विविध क्षेत्रातल्या चार-पाच महिलांना पुन्हा पुन्हा समोर आणलं म्हणजे अख्या महिलांचे प्रश्न संपले असा त्याचा अर्थ होत नाही. बलात्कार मुलींच्या कपड्यामुळे किंवा त्यांच्या जगण्याच्या शैलीमुळे होतो असं म्हणणं तितकसं न्यायिक ठरणार नाही. जे दूसरी तीसरीत शिकणाऱ्या मुलींवर सुद्धा आपली वासना लादतात त्यांना व जे पोटच्या पोरीलाही सोडत नाहीत अशां बाबतीत आपण हा कपड्याचा सल्ला योग्य ठरवू शकतो का? 


बलात्काराची बातमी चवीनं नाही रागानं वाचली पाहिजे


बलात्कार करणाऱ्यावर मग तो कुणीही असो अगदी हवं तर नवा कायदा बनवून अशा गुन्हेगाराला कठोरातली कठोर सजा दिली गेली पाहिजे. अन्यथा, बलात्कार करणारे वंशाचे दिवे सूटून जातात आणि समाजात उध्वस्ततेचं जीणं मुलीला जगावं लागतं… बलात्कार झालेल्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यापेक्षा तिच्यावर झालेल्या या अन्यायाची चवीनं चर्चा करत बसण्यापेक्षा किंवा कुठल्याही बलात्काराच्या बातम्या चवीनं वाचण्यापेक्षा डोक्यात तिडिक गेली पाहिजे. राग कसा येत नाही या सगळ्या गोष्टींचा आपल्याला... हजारो मुलींचं- महिलांचं जीवन एकीकडे सहज उध्वस्त होत असताना कोणत्या वुमन एम्पॉवरमेंटच्या आपण गप्पा करत आहोत याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे... पूर्वी ह्या बॉलीवूडच्या चित्रपटांमधेही मुलीवर बलात्कार दाखवण्याची एक परंपराच सुरू झाली होती. याचाही कळस म्हणून पुढे असं दाखवलं जायचं की ज्या मुलीवर बलात्कार व्हायचा तिच्या तोंडात ठरलेले वाक्य असणार 'अब मैं किसी को मुँह दिखाने के काबील नहीं रही' आणि असं म्हणून ती हातात जे काही असेल ते पोटात खूपसून किंवा गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवणार… 


हे असे आदर्श जर माध्यमांमधून उभे केले जात असतील तर कुठून बलात्काराला एक गंभीर गुन्हा म्हणून पाहण्याची मानसिकता निर्माण होइल... म्हणजे गुन्हा करणारा जिथं महत्त्वाचा मानला पाहिजे तिथे जिच्यावर हा अन्याय घडलाय तिलाच जीव द्यायला इथले बिनडोक कथालेखक आणि इथला समाज प्रवृत्त करताना दिसतोय... त्याचाच परिणाम म्हणून की काय सिनेमा पासून वास्तव जीवनातही बलात्काराच्या गुन्ह्यांमधे स्त्रीचंच जीवन बरबाद होऊन जातं आणि गुन्हेगार पुन्हा नवा गुन्हा करायला तयार होतात.


घरापासून शाळेपर्यंत स्त्रीचा सन्मान गरजेचा


मुळात, महिलेला घरातूनच सन्मान मिळाला पाहिजे. माझी आजी… माझी आई… माझी बहीण… माझी पत्नी… माझी मैत्रीण यांचा फारसा आदर होताना जर दिसत नसेल तर समाजात महिलेचा सन्मान करण्याची वृती निर्माण तरी कशी होणार. ही आदर करण्याची सुरूवात स्वत:पासून होणं गरजेचं आहे. कारण यातूनच एक सामाजिक संस्कार (सोशल कोड) उभा राहील. मग कुठे या अशा वाईट प्रवृत्ती कायद्यासह समाजालाही घाबरून राहतील. मात्र, हे सारं घडताना शासनानं कोपर्डीच्या या घटनेनंतर आतातरी कडक पावलं उचलली पाहिजेत कीमान पुढची एखादी कोपर्डी घडू नये यासाठी तरी...