कविता शर्मा, मुंबई : आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?
 
सुबर्णा घोष यांनी सिझेरियन ऑपरेशनच्या विरोधात एक अभियान सुरू केलंय... गेल्या काही वर्षात गर्भवती महिलांमध्ये सिझेरियन ऑपरेशन करण्याचं प्रमाण वाढलंय. सर्व हॉस्पिटल्सनी किती सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या, याची माहिती देणं बंधनकारक व्हावं, अशी मागणी घोष यांनी change.org  या वेबसाइटच्या माध्यमातून केलीय. दोन महिन्यात तब्बल दीड लाख लोकांनी त्यांच्या या अभियानाला पाठिंबा दिलाय.


अंधश्रद्धाही कारणीभूत...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा डॉक्टर नव्हे, तर रूग्णच सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आग्रह धरतात. विशिष्ट शुभदिनी, शुभ मुहूर्तावर बाळ जन्माला यावं, यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेऊन सिझेरियन करणारे महाभागही या देशात कमी नाहीत... Change.org ने आरटीआयखाली गोळा केलेल्या माहितीनुसार,


- 2015 मध्ये मुंबईत सरकारी हॉस्पिटल्समध्ये 21,744 मुलांचा जन्म सिझेरियननं झाला.


- 2010 मध्ये हेच प्रमाण 9,953 एवढं होतं


- याचा अर्थ पाच वर्षात मुंबईत सिझेरियन शस्त्रक्रियांची संख्या दुपटीनं वाढलीय


आई-बाळाच्या जीवाला धोका...


सिझेरियन शस्त्रक्रिया खर्चिक तर असतेच, शिवाय आई आणि बाळ या दोघांसाठीही जीवघेणी असते. ऑपरेशनच्या वेळी काही चूक झाली तर आयुष्यभर आजारांचा सामना बाळाला करावा लागू शकतो. मातेला रक्तस्त्रावासोबतच जंतूसंसर्ग होण्याचीही शक्यता असते. सिझेरियननं जन्माला आलेल्या बाळांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते, असं गायनकोलॉजिस्ट डॉ. डॉ. अमित धुरंधर यांनी स्पष्ट केलंय. 


मात्र, तरीही अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टर बिनदिक्कतपणं गर्भवती महिलांनी सिझेरियन करावं, यासाठी दबाव आणतात. नॉर्मल डिलिव्हरीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. 


बाळाच्या जन्माबाबत योग्य माहिती मातेला दिली जात नाही. आपल्या बाळाला जन्माला कसं घालायचं, हे ठरवण्याचा अधिकार खरं तर आईलाच असायला हवा. पण पैशाच्या मोहापायी अनेक डॉक्टर तिला सिझेरियन शस्त्रक्रिया करायला भाग पाडतात आणि तिच्या जीवाला धोकाही निर्माण करतात...