दारुबंदी लागू झाल्याने त्याने खाल्ला साबण
पटना : नशा आणि नशा करण्याचं व्यसन माणसाला वेड लावू शकतं.
पटना : नशा आणि नशा करण्याचं व्यसन माणसाला वेड लावू शकतं. याचा प्रत्यय सध्या बिहारमध्ये येतोय. निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे १ एप्रिलपासून बिहार राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. घरातील महिलावर्ग खुश असला तरी दारू पिणाऱ्या लोकांना मात्र या दारुबंदीमुळे खूप त्रास होत आहे.
दारू पिण्याची सवय असल्याने आणि दारू न मिळाल्याने काही जण वेडेपिसे झाले आहेत. काही जण चक्कर येऊन पडल्याच्याही घटना पुढे आल्या आहेत. तर काही जणांना झालेल्या त्रासामुळे हॉस्पिटलात दाखल करावे लागले आहे.
आयबीएन लाईव्हने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती गेली २०-२५ वर्ष दररोज दारू पित होती. मात्र अचानक दारू मिळणे बंद झाल्याने त्या व्यक्तीला काहीच सुचेनासे झाले. शेवटी त्यांनी घरातील साबण खाण्यास सुरुवात केली. पण, नशेची सवय असल्याने घरच्यांचेही त्यांनी ऐकले नाही.
लष्कराच्या कँटिन्समधूनही दारू हटल्याचे वृत्त मिळत आहे. दारू विकत घेण्यासाठी जेव्हा माजी सैनिक लष्कराच्या मिलिटरी कँटिनमध्ये गेले तेव्हा तिथे दारू नसल्याने त्यांनी गोंधळ घातला. मात्र लष्कराच्या कँटिन्समध्ये दारू मिळत राहील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.
गुजरातमध्ये असलेल्या दारुबंदीमुळे तिथे मोठ्या प्रमाणात दारुचा काळाबाजार चालतो अशा बातम्या आपण याआधीही वाचल्या आहेत. बिहारमधील दारुबंदीमुळे येथेही दारुचा काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे.