नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली 9 खासदारांची समिती गठीत केली आहे. या समितीनं 3 ऑगस्टपूर्वी आपल्या अहवाल सादर करावा, असे आदेश महाजन यांनी दिलेत. 


मान यांना उद्या सकाळपर्यंत आपली बाजू समितीसमोर मांडण्यास सांगण्यात आलंय. तसंच या प्रकरणाचा फैसला होईपर्यंत संसदेमध्ये येऊ नये, असंही महाजन यांनी सुचवलंय. मान यांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण करून संसदभवनाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप झालाय. मात्र भाजप, काँग्रेस आणि अकाली दलानं आपल्याविरोधात हातमिळवणी केल्याचं मान यांनी म्हटलं आहे.