अरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
अर्थसंकल्प सादर करताना एका टप्प्यावर अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींनी दिलेल्या एका सूचनेचा आपण अर्थसंकल्पात समावेश केल्याचे जाहीर केले आणि सर्वजण खळखळून हसले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून ब्रेल लिपीतील साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदावरील आयात शुल्क रद्द करण्याची विनंती केली होती. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे माऊंट कॅरमल कॉलेजमध्ये गेले होते. तेव्हा तेथील एका अन्य विद्यार्थीनीने सरकारकडे राहुल गांधींनी ब्रेल साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीवरील आयात शुल्क कमी कराण्याची विनंती करावी अशी मागणी केली होती.
या मुलीने केलेल्या पाठपुराव्यानंतर राहुल गांधींनी सरकारला त्यासंबंधी विनंती केली होती. निर्मला सीतारमन यांनी ती सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठवली.
राहुल यांची ही मागणी जेटली यांनी मान्य केल्याने आता सरकारची राहुलविरोधी भूमिका थोडी का होई ना मवाळ झाल्याची आता चर्चा आहे. या निर्णयाची घोषणा करताना जेटलींनी राहुल गांधींना त्याचे श्रेय दिले.