नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सॅल्युट केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे  भारतीय जवानांनी LOC वर अतिरेक्यांचा खात्मा केला.  केजरीवालांनी पंतप्रधान मोदी यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीबद्दल मोदींना सॅल्युट केलाय.


भारतीय लष्कराने केलेल्या दाव्याप्रमाणे, भारतीय जवानांनी २७-२८ सप्टेंबरच्या रात्री सीमेजवळ सर्जिकल स्ट्राईक करुन सुमारे ४० अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 


भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नाही, तर नियंत्रण रेषेवर चकमक झाली, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.  पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराने भारताचा हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. 


 'आपल्या पंतप्रधानांशी १०० मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, मात्र पंतप्रधानांनी जी इच्छाशक्ती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांना सॅल्युट करतोट, असं केजरीवालांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करून हा  संदेश सोशल मीडियावर दिला आहे.


 'भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. आता पाकिस्तान जागतिक मीडियात खोट्या बातम्या पसरवत आहे. इतकंच नाही तर बॉर्डरवर पत्रकारांना नेऊन, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे', असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.


'मी पंतप्रधानांना आवाहन करतो की, जसं जमिनीवरुन पाकिस्तानला उत्तर दिलं, तसंच पाकिस्तानच्या या खोट्या प्रचाराचाही पर्दाफाश करावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत', असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.