सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड
सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.
सुरत : सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे. या धाडीमध्ये आयकर विभागाला घबाड सापडलं आहे. आयकर विभागाला भाजीवालांच्या ऑफिसमध्ये 400 कोटी रुपयांची रोकड, सोनं-चांदी, दागिने आणि जमिनीची कागदपत्र सापडली आहेत.
किशोर भाजीवाला हे फायनान्सर आहेत. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला. या पैशांचा स्त्रोत नेमका काय आहे, याबाबत आयकर विभागाकडून अधिक तपास सुरु आहे.
नोटबंदीनंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धाडसत्र सुरूच आहे. याआधी आज मुंबईत ईडीनं झवेरी बाजारातल्या चार कंपन्यांवर छापे टाकले. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर या कंपन्यांकडून 69 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आले. या कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा कऱण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या संशयित व्यवहाराप्रकरणी हे छापे टाकण्यात आलेत.
पंजाबच्या मोहालीमध्येही ईडीनं टेलरकडून 30 लाख रुपये जप्त केले आहेत. यामध्ये 18 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि अडीच किलो सोन्याचा समावेश आहे. ईडीनं ही केस आयकर विभागाकडे सुपूर्द केली आहे.