नवी दिल्ली : भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेल्या डॉ. नरेंद्र जाधवांनी राज्यसभेत स्वतंत्र बसण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या निर्णयावर भाजप खासदार अमर साबळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून सध्या जाधव विरूद्ध साबळे असा कलगीतुरा रंगलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदारकी मिळाल्यानंतर जाधवांनी सत्ताधारी बाकावर न बसण्याची भूमिका घेतली. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रपतींनी नियुक्त केल्यानंतर कोणाच्या बाजूने बसायचं, याचा विकल्प दिला जातो. पहिल्या दिवशीच मी तो निर्णय घेतला होता. मी स्वतंत्र बसणार आहे. मी भाजप किंवा सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही घटकात सामील होणार नाही, अशी प्रतिक्रिया नरेंद्र जाधव यांनी दिली आहे. 


पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक आर्थिक विषयावर काम करायचंय. मी सत्ताधारी पक्षाला सहकार्य करणार आहे, त्यात काही गैर नाही, असंही नरेंद्र जाधव म्हणाले आहेत.  


नरेंद्र जाधव यांच्या या भूमिकेमुळे भाजप खासदार अमर साबळेंनी नरेंद्र जाधव यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र जाधवांनी ताकाला जाऊन भांडं लपवू नये. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जाधव यांना खासदारकी मिळाली आहे. भाजपच्या बाकावर बसायला काय हरकत आहे ? नरेंद्र जाधव अनेकवेळा आरएसएस च्या व्यासपीठावर आले. भाजपकडून त्यांनी खासदारकीचं तिकीट पदरात पाडून घेतलं. भाजपनं खासदारकी दिली तर कबूल करायला काय हरकत आहे, असे सवाल साबळेंनी विचारला आहे.