शहिदाच्या मुलीची दाऊदशी तुलना, भाजप खासदार वादात
म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या राजमस कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या राड्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतायत. यावर कारगिल युद्धातील शहिद जवानाची लेक गुरमेहर हिनं सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु केलं होतं. त्यावर टीका करताना प्रताप सिम्हा यांनी गुरमेहरची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केलीय.
त्यांनी एका बाजुला गुरमेहर आणि दुस-या बाजुला दाऊद इब्राहिमचा एक फोटो ट्विट केला. देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदने किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला असं या फोटोमध्ये म्हटलंय.
या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं असं लिहीलंय. तर दाऊदच्या हातात असलेल्या पोस्टरवर 1993 च्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना मी नाही मारलं तर बॉम्बमुळे ते मृत्यूमुखी पडले असं लिहिलंय. सिम्हा यांच्या या वादग्रस्त ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेसने यावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.