नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याची सुरूवातही गोंधळातच झाली. नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ कायम ठेवल्यानं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. अधिवेशनाच्या कामकाजाचा सलग चौथा दिवस पाण्यात गेला आहे.


नोटाबंदीच्या गोंधळानं लोकसभेचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. मात्र तरीही गोंधळ थांबत नसल्यानं दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. तर दुसरीकडे राज्यसभेतही वेगळी परिस्थिती नव्हती.  राज्यसभेत विरोधकांनी नोटाबंदीच्या विरोधात सरकारनं उत्तर देण्याआधीच जोरदार गदारोळ सुरू केला. कामकाज सुरू झाल्यावर दोन्ही सभागृहात रेल्वे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीतच प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाला. तर राज्यसभेत प्रथम मायावती आणि नंतर गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीवर चर्चेची मागणी लावून धरली. त्यावेळी आझाद यांनी नोटाबंदीनंतर रांगेत मृत्यूमुखी पडलेल्यांनाही आदरांजली वाहण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेठलींनी विरोधकांना धारेवर धरलं.