बडगाम : जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. या दहशतवाद्याकडे असलेला मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आलाय. या चकमकीत एक जवान जखमी झालाय. दुरबुर्ग आणि चद्दुरा या भागात अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर या भागात तपासमोहीम हाती घेण्यात आली. लपून बसलेल्या एकमेव अतिरेक्यानं जवानांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल लष्करानंही गोळीबार सुरू केला. ही कारवाई सुरू असताना स्थानिकांनी मोर्चा काढून त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.


मोर्चेकरी पोलीस आणि कारवाई करणाऱ्या जवानांवर दगडफेक करत होते. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला. कोंडीत सापडलेल्या अतिरेक्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी असे मोर्चे कायमच काढले जातात. एन्काऊंटर थांबलं असलं तरी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये अद्याप लहानसहान चकमकी सुरू असल्याचं वृत्त आहे.