धक्कादायक : `हेअर ट्रान्सप्लान्ट`नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय.
चेन्नई : चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय.
आपल्या टक्कलावर उपाय म्हणून संतोषनं गेल्या महिन्यात केस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यावर शस्त्रक्रियाही पार पडली. पण, शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत ताप येऊन संतोषचा मृत्यू झाला. तो मेडिकलचा विद्यार्थी होता.
शस्त्रक्रिया करणारे सर्जन नव्हतेच
१० तासांच्या प्रक्रियेनंतर संतोषच्या डोक्यावर १२०० केसांचं प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. 'अॅडव्हान्स्ड रोबोटीक हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटर' नावाच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया करणारे सर्जन नव्हते तर अनेस्थेटिस्ट होते... दोघे डॉक्टर सध्या फरार आहेत.
कमवायचे धंदे...
धक्कादायक म्हणजे, संतोषची आई पी. जोसेबिन या स्वत: नर्स आहे. 'हे डॉक्टर दिवसाला ५० ते ६० लाख कमावत होते... त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे. त्यांना जीवाची किंमत नाही. मी तर माझा मुलगा गमावलाय आणखी कुणी गमावू नये... त्यांना अटक व्हायला हवी' असं त्यांनी म्हटलंय.
हॉस्पीटल नाही तर सलूनचं लायसन्स
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जिथे ही शस्त्रक्रिया पार पडली त्याला लायसन्स केवळ 'हेअर सलून'चं लायसन्स मिळालं होतं. तेदेखील दोन महिन्यांपूर्वीच संपलंय. चीनमध्ये ट्रेनिंग घेतलेला डॉक्टर इथे असला तरी गरजेच्या वेळी लागणारी साधनं मात्र इथं उपलब्ध नव्हती.
आरोपी मूळचे पुण्याचे
आता, या सेंटरला टाळ ठोकण्यात आलंय. कोणत्याही लायसन्सशिवाय औषधांचा मोठा साधा इथून जप्त करण्यात आलाय. या सेंटरचे मालक मूळचे पुण्याचे आहेत. त्यांनी सात वेगवेगळ्या शहरांत बोगस १७ दुकानं उघडून ठेवलीत, अशी माहिती मिळतेय.