विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने याचिका दाखल करावी - कोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने आज लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका, दाखल करून घेण्यास नकार दिला. काँग्रेसला हा दर्जा हवा असेल, तर त्यांनी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका, दाखल करून घेण्यास नकार दिला. काँग्रेसला हा दर्जा हवा असेल, तर त्यांनी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
काँग्रेसने २०१४ मध्येच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे विचारणा केली होती. ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही कॉंग्रेसची मागणी धुडकावली होती. या वेळी महाजन यांनी १९८० आणि १९८४ मध्येही याच कारणामुळे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते पद सध्या ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे.
घटनात्मक तरतुदीनुसार, लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदासाठी संबंधित पक्षाकडे किमान ५५ इतके संख्याबळ असणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. भाजपनंतर तोच सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी, विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापर्यंत ते पोचू शकले नव्हते.