एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड
देशात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाच भारताची विमानसेवा एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. झी मीडियाने हा घोटाळा उघड केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये कॅनडामधल्या ऑन्टेरीया इथल्या न्यायालयानं, एका दलालाला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई : देशात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाच भारताची विमानसेवा एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. झी मीडियाने हा घोटाळा उघड केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये कॅनडामधल्या ऑन्टेरीया इथल्या न्यायालयानं, एका दलालाला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
नाजिर कारीगर असं या अनिवासी भारतीय दलालाचं नाव आहे. त्यानं एअर इंडियाच्या अनेक अधिका-यांना लाच दिली होती. मात्र ते लाचखोर अधिकारी कोण, हे अजून गुलदस्त्यातच आहे. विशेष म्हणजे कॅनडातल्या न्यायालयाच्या निकालात, तत्कालीन नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाचा उल्लेख आहे. प्रफुल्ल पटेल यांना किती आणि कधी लाच दिली गेली यांचीही नोंद, न्यायालयानं आपल्या निकालात केलेली आहे.
एअर इंडियाला फेशियल रेकगनिशन तंत्रज्ञान पुरवण्याचं कंत्राट आपल्याला मिळावं याकरता, कॅनडातली क्रिप्टोमेट्रिक्स कंपनी प्रयत्न करत होती. त्याकरता कंपनीनं अनिवासी भारतीय दलाल नाजिर कारिगर मार्फत लाच दिली होती अशी नोंद, न्यायालयाच्या निकालपत्रात आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी झी न्यूजला दिलेल्या लिखीत खुलाशामध्ये, या सर्व घटनेचा इन्कार केला आहे. हा व्यवहार झाला नाही तसंच टेंडरही रद्द करण्यात आलं होतं असं पटेल यांनी म्हंटलंय.