डाळीच्या साठ्यावरची मर्यादा हटवली
देशात लागू असणारी डाळीच्या साठ्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटर द्वारे ही माहिती जाहीर केलीय.
नवी दिल्ली : देशात लागू असणारी डाळीच्या साठ्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटर द्वारे ही माहिती जाहीर केलीय.
हमी भावापेक्षा कमी भावानं ज्यांना डाळ विकावी लागत आहे. अशा शेतक-यांचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं पासवान यांनी म्हटलंय. तूर डाळींचे दर किलोमागे दोनशे रुपयांवर गेल्यानं सरकारनं साठेबाजीला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा घातल्या होत्या.
यंदा मात्र डाळींच्या उत्पादनात रेकॉर्ड ब्रेक वाढ झालीय. त्यातच व्यापाऱ्यांच्या साठ्यावर मर्यादा असल्यानं खाजगी खरेदीलाही मर्यादा येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ लागलं होतं. या नुकसानाला आळा घालण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल असं सरकारचं म्हणणं आहे.