नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी माझी - मोदी
नोटाबंदीचा जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती.
नवी दिल्ली : नोटाबंदीचा जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती.
यामुळे अनेकांना त्रास होणार आहे, हे मोदींना माहिती होते. तरी त्यांनी हा निर्णय देश हितासाठी घेतला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याची बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.
नोटबंदी करण्यापूर्वी मी सर्व संशोधन केले आहे. नोटाबंदीचा निर्णय फसल्यास, त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर असेल,’ असे पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटले होते. या बैठकीत सहभागी झालेल्या तीन मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना स्वत:ची लोकप्रियता पणाला लावल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
नोटाबंदीच्या मोठ्या निर्णयात पंतप्रधान मोदींनी काही नोकरशहांना सहभागी करुन घेतले होते. भारतीय अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नसलेल्या काही विश्वासू लोकांसोबत चर्चा करुन मोदींनी हा नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या निर्णयावर काम करणाऱ्या लोकांना हा निर्णय जाहीर करण्याआधी कोणालाही न सांगण्याचे आदेश देण्यात आले होते.
मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयात काही तरुण अभ्यासकांनीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तरुण अभ्यासकांची ही टीम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी नोटाबंदीच्या निर्णयाची तयारी करत होती. नोटबंदीचा निर्णय अतिशय गोपनीय ठेवण्याची जबाबदारी या टिमवर होती.
नोटाबंदीच्या निर्णयासाठी काम करणाऱ्या टिममध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या हसमुख अढिया यांचा समावेश होता. ५८ वर्षीय अढिया पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले आहे. हसमुख अढिया यांच्याकडे २०१५ मध्ये महसूल सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांना सहकार्य करण्याचे काम अढियांकडे देण्यात आले होते. मात्र तरीही अढिया यांना थेट मोदींना संपर्क साधण्याचे अधिकार देण्यात आले होते.
नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला असला तरी या निर्णयाची थोडीफार कल्पना देणाऱ्या घटना मध्यंतरीच्या काळात घडल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही विश्लेषकांनी अधिक रकमेच्या नोटा बंद केल्या जाऊ शकतील, असे म्हटले होते. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात नव्या सिरीजच्या नोटा बदलणार असल्याचे सांगितले होते. ऑगस्टमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या डिझाईनला मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये दोन हजाराच्या नोटांच्या छपाईला सुरुवात झाली होती.