भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशचे जनसंपर्क मंत्री राजेश शुक्ल म्हणाले की, जगातील या पहिल्या सफेद वाघाच्या सफारीसोबतच या वाघांचे संवर्धन आणि प्रजनन केंद्र सुरू केले जाणार आहे. ३ एप्रिलला मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कोळसा व खनिज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणारं आहे.


ही माहिती देतानाच राजेश शुक्ल यांनी आपली एक आठवणही शेअर केलीय. '२७ मे १९५१ साली महाराज मार्तंड यांनी शिकार करतेवेळी एका सफेद वाघाला देवा गाव येथे पकडले होते. त्याचे मोहन असे नामकरण करुन त्याला गोविंदगढ महालात ठेवण्यात आले होते. मोहनचा जेव्हा १८ सप्टेंबर १९६९ साली मृत्यू झाला तेव्हा मी शाळेत होतो. त्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोकसभा झाल्या. अनेक बाजारही बंद झाले होते,' असं शुक्ल यांनी म्हटलंय.