पीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.
नवी दिल्ली : केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.
आता पीएफ धारकांना तब्बल सहा लाख रूपयांचा विमा मिळणार आहे. याचा लाभ जवळपास चार कोटी पीएफ धारकांना होईल.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त समितीने या निर्णयाला हिरवा कंदिल दिला असला तरी अजून त्याची अधिसूचना निघालेली नाहीय, कारण कायदा मंत्रालयाने या निर्णयाला अजून स्वीकृती दिलेली नाही. कायदा मंत्रायलाच्या स्वीकृतीनंतर केंद्रीय श्रम मंत्रालय वाढीव विमा रकमेची अधिसूचना जारी करणार आहे.
पीएफ धारकांच्या ईपीएफओकडे जमा असलेल्या रकमेशी निगडीत विमा संरक्षण योजना राबवण्याचा निर्णय पीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घेतला होता.
या निर्णयानुसार प्रत्येक पीएफ धारकांना किमान 3.6 लाख रूपयांचा निश्चित विमा मिळेल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामध्ये आता घसघशीत वाढ करण्यात आलीय. नव्या वाढीनंतर पीएफ धारकांना निश्चित असा 6 लाख रूपयांचा विमा मिळेल.