मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!
नवी दिल्ली : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे.
नवी दिल्ली : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे. या सेलअंतर्गत नकारात्मक बातम्या आणि प्रतिक्रिया तपासल्या जाऊन त्याचा प्रतिवाद केला जाणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या महिन्यात नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल सेक्रेटरिएट'ने नॅशनल मीडिया अॅनालिटिक्स सेलची स्थापना करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. ज्याद्वारे खाजगी ब्लॉग्ज, टेलिव्हिजन चॅनल्स, वृत्तपत्रांच्या वेब साईट्स, फेसबूक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसांरख्या वेब साईट्सवर चोवीस तास पाळत ठेवली जाईल.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारला आजकाल अशा अनेक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो ज्यामुळे सरकारविषयी नकारात्मकता पसरली जात आहे. या येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांना पत्रकार परिषद किंवा प्रसिद्धी पत्रक काढून उत्तर दिले जाणार आहे.
ऑगस्ट २०१५ मध्ये सरकारने सर्व मंत्रालयांना एक वेब टीम तयार करुन ऑनलाईन प्रतिक्रियांना तिथे उत्तर देण्याचे आदेश दिले होते. या नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचाही सरकारचा मानस आहे.