नवी दिल्ली :  भारताचे हिमयोद्धे लान्स नायक हणमंत्तप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोत्तम उपचारांसाठी सारं काही करूनही दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात गेल्या 24 तासात हणमंत्त्प्पांची प्रकृती आणखी ढासळी. आणि सकाळी पावणे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हनुमंत्तप्पा सकाळी गहिऱ्या कोमात गेले.


उणे ५० अंश सेल्शिअसमध्ये सहा दिवस काढल्यानं त्यांच्या किडन्यांनी काम करणं बंद केलं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठाही होत नव्हता. निमोनियाचीही लक्षणं समोर आली होती. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम चोवीस तास त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तैनात होती. पण सारं काही निष्फळ ठरलं.


दरम्यान, देशाच्या कानाकोपऱ्यात हणुमंत्ताप्पांसाठी प्रार्थना सुरू होती. बौद्ध गयेत आज बौद्ध धर्मियांनी हणमंत्ताप्पांसाठी प्रार्थना केली. तर तिकडे पुरीच्या किनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी लान्स नायक हणुमंत्ताप्पांचं शिल्प तयार करून त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केलीय. पण, हिमयोद्ध्याला वाचवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत.