नवी दिल्ली : बंगळूर, हैदराबादसह  दिल्लीलगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नदीनाल्यांवरील अतिक्रमणामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये तात्काळ पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकासाची बेटे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बड्या महानगरांचे पितळ आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा उघडे पडले. बहुतांश ठिकाणी महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती, तर अनेक शहरांत सखल भागांत पाणी साचले होते. 


दिल्ली-गुडगाव महामार्ग आणि सोहना रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने अक्षरश: रेंगाळत चालली होती, पंपाच्या साह्याने रस्त्यांवरील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू असून, वाहतूक पोलिस आणि अग्निशामन दलाचे कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत. पूरग्रस्त भागांत अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. 


दिल्ली आणि गुडगावमधील ट्रॅफिक जॅमवरून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर टीकास्त्र सोडले. या टीकेमुळे सिसोदिया चांगलेच भडकले त्यांनी केवळ नाव बदलून विकास होत नाही, असा टोला खट्टर यांना लगावला आहे.


हैदराबादचे पावसामुळे बेहाल झाले, तोली चौकी, मेहद्दीपट्टणम, मदाहपूर, बेगमपेठ आणि सिकंदराबाद भागांतील वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोळ झाला. मुंबईमधील वाहतुकीसदेखील पावसाचा मोठा फटका बसला. अंधेरीमध्ये पश्‍चिम महामार्गावरील वाहतूक खोळंबली असून, वांद्रा वरळी सी लिंकवरील वाहतुकीचा वेगदेखील मंदावला होता.