त्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे. हुर्रीयत नेत्यांनी यातल्या काही खासदारांच्या तोंडावर दरवाजा बंद केल्यामुळे हे शिष्टमंडळ तोंडघाशी पडल्याची चर्चा रंगली आहे.
राजनाथ सिंग यांनी या हुर्रीयतच्या फुटिरतावादी नेत्यांना सुनावलं आहे. फुटिरतावाद्यांचं हे वागणं काश्मिरीयतला धरून नाही. फुटिरतावाद्यांकडे साधी माणुसकी नाही अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी दिली आहे.
राजनाथ सिंग यांना मात्र हा दौरा फसल्याचं मान्य नाही. श्रीनगर आणि जम्मूमध्ये आपण अनेकांशी चर्चा केली आणि यातून काश्मीर प्रश्न सुटण्यासाठी मदतच होईल, असं ते म्हणाले. काँग्रेस, डाव्यांसह विरोधी पक्षांनीही काहीशी अशीच भूमिका मांडली आहे. आता दौरा आटोपल्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक होईल आणि त्यात पुढल्या पावलांची चर्चा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.