नवी दिल्ली : सेनेतील जवानांचे एकानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या साहाय्यानं जाहीर झाल्यानंतर गृह मंत्रालयाची झोप उडालीय. यावर तातडीनं कारवाई करत गृह मंत्रालयानं निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी करत टाकलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रालयानं निमलष्करी दलाच्या जवानांवर व्हिडिओ आणि खाजगी फोटो टाकण्यावर बंदी घातलीय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सेनेच्या अनेक युनिटमध्ये स्मार्टफोन वापरण्यावरदेखील बंदी आणण्यात आलीय. यानंतर, कोणताही जवान आपले फोटो किंवा मजकूर ट्विटर, फेसबुक, व्हॉटसअप, यूट्यूब, इन्स्टाग्रामवर टाकू शकणार नाही... जवान ड्युटीवर असताना मोबाईलचा वापर करू शकत नाहीत, हा अगोदरपासून लागू असलेल्या नियमाची आता कठोर अंमलबजावणी केली जाईल.


गृहमंत्रालयाची ही कारवाई म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होतेय. परंतु, सोशल मीडियाच्या वापरावर काळजी घेण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलंय. निमलष्करी जवानांना सोशल मीडियाच्या वापरापूर्वी डीजींची परवानगी घेणं आवश्यक राहील.


जवानांच्या तक्रारी दूर करण्यासाठी...


तसंच जवानांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण सेलची माहिती जवानांना दिली जाणार आहे. जवानांच्या कामावेळी होत असलेल्या त्रासाबाबतच्या तक्रारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या मुख्यालयांमध्ये तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. जवानांना कोणतीही तक्रार असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहनही बिपीन रावत यांनी यावेळी केलं आहे.