शिमला : पती पत्नीने देवाची एकत्र पूजा करणे हे अनेक संस्कृतींमध्ये शुभ मानले गेले आहे. पण हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामधील एका मंदिर मात्र याला अपवाद आहे. या मंदिरात जोडप्याने पूजा केली तर नवरा बायको विभक्त होतात असा समज आहे. म्हणजे या मंदिरात जोडप्याने पूजा करणे त्यांच्या पुढील एकत्र आयुष्यासाठी अनिष्टकारक आहे. रामपूर स्टेशनजवळ हे श्राईकोटी दुर्गादेवीचे मंदिर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्राचीन मंदिरात जोडप्याने पूजा किंवा दर्शन घेण्यावरही बंदी आहे. महिला आणि पुरूषांसाठी दर्शनाची वेगवेगळी व्यवस्था आहे. ११ हजार फूट उंचीवरच्या या मंदिराबाबत अशी कहाणी आहे, शंकर पार्वतीचे मुलं गणेश आणि कार्तिकेय यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद सुरू झाला आणि जो श्रेष्ठ असेल त्याचा विवाह प्रथम केला जाईल असे ठरले.


श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांना संपूर्ण पृथ्वीला फेरी मारून जो प्रथम येईल तो श्रेष्ठ असे सांगितले. कार्तिकेय त्याचे वाहन मोरावरून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला मात्र गणेशाने शिवपार्वती भोवतीच फेरी मारली आणि माता पित्यांच्या चरणातच पूर्ण ब्रहमांड असल्याचे सांगितले. साहजिक गणेशाचा विजय झाला आणि कार्तिकेय परत येण्याचा आत त्याचा विवाह ही झाला.


पृथ्वीप्रदक्षिणा करून परतलेल्या कार्तिकेयाला हे समजताच तो रागावला व त्याने विवाह करणार नाही असे जाहीर केले. त्याचा पार्वतीमातेला राग आला आणि तिने शाप दिला की या ठिकाणी जे जोडप्याने पूजा करतील ते वेगळे होतील. या मंदिराच्या दारावर गणेशाची प्रतिमा पत्नीसह आहे.