बंगळुरू : देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इन्फोसिसचे सह-संस्थापक आमि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी संचालक मंडळावर गंभीर आरोप केल्यानं आयटी आणि अर्थ जगतात मोठी खळबळ उडालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्फोसिसचं सध्याच्या संचालक मंडळनं कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत अत्यंत ढिसाळ कारभार चालवल्याचा मूर्तींचा आरोप आहे. काही लोकांना मनमानी कारभार करण्याची सूट आणि सेव्हरेन्स पे (कॉन्ट्रॅक्ट वेळेआधीच संपवताना दिला कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा निधी) मिळतेय, त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचं मनोबल ढासळत असल्याचं त्यांनी म्हटलंय.  


त्यांनी कंपनीचे माजी लीगल आणि कम्प्लायन्स हेड डेव्हिड केनेडी आणि माजी सीएफओ राजीवन बन्सल यांच्या 'सेव्हरेन्स पे'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. कंपनीच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा सेव्हरेन्स पे दिला जातो. परंतु, केनेडी यांना 12 महिने आणि बन्सल यांना 30 महिन्याचा सेव्हरेन्स पे दिला गेलाय. 


याबाबतीत जवळपास 1800 हून अधिक कर्मचाऱ्यांचे तक्रारीचे ई मेल आपल्याला मिळाल्याचंही मूर्तींनी म्हटलंय. यासाठी, कंपनीच्या संचालक मंडळावर नाराजीही त्यांनी व्यक्त केलीय. 


दरम्यान संचालक मंडळानं मूर्ती यांचे आरोप फेटाळले असून आरोपांची चौकशी करण्यासाठी सीरिल अमरचंद मंगलदास यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याचं सीईओ विशाल सिक्का यांनी म्हटलंय.