मुंबई : भारताची दूसरी आणि सध्याच्या काळात जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट आता काही दिवसांतच निवृत्त होणार आहे. या निवृत्तीचा शानदार कार्यक्रम मुंबईत होणार आहे. त्यासाठी विराटने कोच्चीहून मुंबईच्या दिशेने अखेरचा प्रवास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटमधलं इंजिन याआधीच काढून घेण्यात आलं आहे. तेव्हा 20 हजार टनांहून जास्त वजनाच्या विराटला टग बोटीनं खेचत मुंबईला आणलं जाईल. काही दिवसांतच विराटला सन्मानपूर्वक निवृत्त केले जाणार आहे. मुंबईतील निवृत्तीचा समारंभ पार पडल्यावर विराटला आंध्र प्रदेशकडे सोपवले जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या समुद्र किना-यावर विमानवाहू युद्धनौका विराटचे संग्रहालयामध्ये रूपांतर केले जाणार आहे.


दुस-या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात 1944 ला इंग्लंडमध्ये या युद्धनौकेच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र एक वर्षानंतर महायुद्ध संपल्याने या युद्धनौकेची बांधणी काहीशी लांबणीवर पडली. अखेर 1959 ला ही युद्धनौका इंग्लंडच्या नौदलात एचएमएस हर्मिस या नावाने दाखल झाली. 1959 ते 1984 अशा सेवेनंतर ही युद्धनौका इंग्लंड नौदलाच्या सेवेतुन निवृत्त झाली. तेव्हा भारताने या युद्धनौकेचे नूतनीकरण करून ती विकत घेतली आणि आयएनएस विराट या नावाने भारतीय नौदलात दाखल झाली.


विराटचे त्यानंतर पाच वेळा नुतनीकरण करण्यात आले. अखेर दुस-या महायुद्धाच्या काळातील ही युद्धनौका दुरुस्तीपलीकडे गेल्याने आता लवकरच नौदलाच्या सेवेतून निवृत्त होणार आहे.