निलंबित मंत्र्यांचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान
आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे. मी माझी आमदारकी सोडतो, तुम्ही तुमची सोडा. दोघं एकमेकांसमोर निवडणूक लढू कोण जिंकतंय बघा असं मिश्रांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कपिल मिश्रांनी केलाय. त्यावर केजरीवालांनी थेट काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आम आदमी पक्षानं हे भाजपचं ष़डयंत्र असल्याचा आरोप केलाय.
दरम्यान, कपिल मिश्रा यांनी घोटाळ्याचे पुरावे आज सकाळी सीबीआयकडे सोपवणार असल्याचं म्हटलंय. आपण पुरावे सीबीआयकडे देऊ पण सार्वजनिक करणार नाही असं मिश्रांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे आज दिल्ली विधानसभेचे एक दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यापासून केजरीवालांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे एक दिवसाच्या अधिवेशनात तरी केजरीवाल बोलणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.