धारवाड : भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भावपूर्ण निरोप देताना, अवघा देश शोकाकूल झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लान्स नायक हणमंतप्पा यांना देण्यात भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. हणमंतप्पा अमर रहे आणि भारतमाता की जय... अशा घोषणा देत धारवाडजवळच्या बेटद्दूर या गावात या शूरवीराला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. हा वीर सुपुत्र अखेरची चीरनिद्रा घेण्यासाठी भारतमातेच्या कुशीत विसावला, तेव्हा उपस्थितांचा बांध फुटला.


हणमंतप्पांना अखेरचा सलाम!


३३ वर्षीय हणमंतप्पा १३ वर्षांपूर्वी लष्करात सामील झाले. मद्रास रेजिमेंटच्या १९ साव्या बटालियनमधले ते कार्यरत होते. गेल्या ३ फेब्रुवारीला सियाचीनमध्ये गस्त घालणाऱ्या लष्करी पथकावर हजार मीटर उंचीचा बर्फाचा डोंगर कोसळला. त्यात हणमंतप्पांसोबतचे ९ जवान शहीद झाले. मात्र २५ फूट बर्फाखाली गाडले जाऊनही, सहा दिवसानंतर हणमंतप्पांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. 


उणे ५० अंश सेल्शिअसमध्ये बर्फाखाली सहा दिवस काढल्यानं त्यांच्या किडन्या काम करत नव्हत्या. त्यांच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठाही होत नव्हता.. निमोनियाचीही लक्षणं समोर आली. दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम चोवीस तास त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होती. या हिमयोद्ध्याचे प्राण वाचावेत, यासाठी अख्खा देश प्रार्थना करत होता. मात्र गुरूवारी पावणेबारा वाजता त्यांची जीवनज्योत मालवली.


हणमंतप्पांचं पार्थिव गुरूवारी रात्री बेट्टादूरला पोहोचलं, तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या जाँबाज हिमयोद्ध्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी रीघ लागली होती. या गर्दीच्या एका डोळ्यात होतं दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात होता सार्थ अभिमान... भारतमातेच्या या सुपुत्राला झी मीडियाचा सलाम...