आता कळणार किती आनंदी आहे जनता!
देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.
भोपाळ : देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारावेळीच मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याबाबत घोषणा केली होती. शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत नव्या विभागाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आलीय.
सुरूवातीला मुख्यमंत्र्यांकडेच या खात्याचा कार्यभार असेल, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलाय. राज्यातली जनता किती आनंदी आहे, हे मोजण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे.
'हॅप्पीनेस विभागा'ची स्थापना करणारं मध्यप्रदेश हे पहिलं राज्य ठरलंय. 'रोटी, कपडा और मकान' याशिवाय आणखीही काही गोष्टी जनतेच्या आनंदासाठी महत्त्वाच्या असतात, असं सरकारला वाटतंय.
'हॅप्पीनेस' विभागात काही तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या काही सूचनाची अंमलबजावणीही होणार आहे.