बंगळुरूत महिलांचा `सामूहिक विनयभंग`
नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलंय. नववर्षाची सुरुवात करतानाच बंगळुरूमध्ये काही महिलांसोबत घोळक्यानं अश्लील वर्तन आणि छेडछाड करण्यात आली.
बंगळुरू : नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलंय. नववर्षाची सुरुवात करतानाच बंगळुरूमध्ये काही महिलांसोबत घोळक्यानं अश्लील वर्तन आणि छेडछाड करण्यात आली.
'बंगलोर मिरर'नं दिलेल्या बातमीनुसार, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बंगळुरूच्या एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर 31 डिसेंबरच्या रात्री अनेक घोळके जमले होते. या गर्दीत अनेक महिला, मुली आणि लहान मुलांचाही समावेश होता. परंतु, वर्तमानपत्रानं छापलेल्या फोटोंमधून महिलांसोबत झालेल्या अश्लील कृत्यं स्पष्टपणे समोर येत आहेत.
अनेक महिलांसोबत घोळक्यामध्ये छेडछाड केली गेली... कुणाला अश्लील शब्द वापरण्यात आले... तर कुणाला घाणेरडे स्पर्श... या घटनांमुळे हादरलेल्या काही महिलांनी आपल्या कुटुंबीयांची मदत घेतली... तर कुणी अश्रुंना वाट मोकळी करून दिली... तर अनेक जणींनी या हरकतींना प्रत्यूत्तरदेखील दिलं.
परंतु, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1500 पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. याशिवाय कर्नाटक राज्य रिझर्व्ह पोलीस, सिटी आर्म्ड रिझर्व्ह कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं... काही महिलांसोबत छेडछाड झाली मात्र याविषयी रितसर कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. परंतु, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करतील.