नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात लष्कर भरतीचा पेपर फेब्रुवारी महिन्यात फुटला होता. याबाबत शिवसेनेने राज्यसभेत आवाज उठवला होता. याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि सीबीबाय चौकशीचे आदेश दिलेत. पेपरफुटी फक्त पुणे विभागात झाली आहे आणि या प्रकरणाच्या तपासकामावर संबंधित लष्करी अधिकारी लक्ष ठेवून आहेत, असेही भामरे म्हणाले.  


भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने अंबाला, चेन्नई आणि जयपूरमध्ये लष्करी भरती प्रक्रियेची परीक्षा घेणार असल्याचे भामरे यांनी राज्यसभेत सांगितले. 


परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार होती, मात्र पेपर फुटल्याचे लक्षात येताच भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती भामरे यांनी दिली. पेपरफुटीची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गोवा, नागपूर आणि पुणे येथे छापे टाकले होते, असे भामरे यांनी सांगितले.


पेपरफुटीच्या मुद्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणाचा संबंध त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्याशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरशी असल्याच्या मुद्याकडे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले होते. लष्करी भरतीचा पेपर फुटणे हे लष्कराच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश असल्याचे राऊत म्हणाले.


पेपरफुटी प्रकरणी स्थानिक पातळीवर पोलीस चौकशी करत आहेत तसेच लष्करी अधिकाऱ्यांनीही उच्चस्तरिय चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून पेपर फोडणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले.