बँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स आहे का तपासा, अन्यथा...
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय.
मुंबई : भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयनं आपल्या खात्यात निर्धारीत करण्यात आलेला कमीत कमी बॅलन्स न ठेवणाऱ्या ग्राहकांना दंड आकारायला सुरुवात केलीय.
सोबतच चेक बूक आणि लॉकरसाठी अधिक शुल्क द्यावं लागणार आहे. यामध्ये बँकेत नुकत्याच विलिन झालेल्या सहा बँकांच्या ग्राहकांचाही समावेश आहे.
एसबीआयच्या वेगवेगळ्या सेवांसाठी शुल्क वाढवण्याच्या निर्णयानंतर आता इतर बँकाही त्या दिशेनं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
महानगरांत एसबीआयच्या शाखेत असणाऱ्या आपल्या अकाऊंटमध्ये ग्राहकांना कमीत कमी ५००० रुपये बॅलन्स ठेवावा लागणार आहे. तर शहरी आणि अर्ध-शहरी भागांत क्रमश: ३००० रुपये आणि २००० रुपये कमीत कमी बॅलन्स राहील. ग्रामीण शाखांमध्ये मात्र कमीत कमी १००० रुपये बॅलन्स निर्धारीत करण्यात आलाय.
कमीत कमी बॅलन्स राखण्यात ग्राहकांना अपयश आलं तर २० रुपये (ग्रामीण भाग) ते १०० रुपयांपर्यंत (महानगर) दंड भरावा लागणार आहे. सुरभि, मूळ बचत खातं आणि पंतप्रधान जन धन योजना खात्यांना हे नियम लागू होणार नाहीत.
३१ मार्चपर्यंत बिना चेक बुक खात्यांत ५०० रुपये आणि चेक बुक सुविधेसोबत १००० रुपये ठेवणं बंधनकारक होतं.