पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांना तंबी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना कामं वेळेत पूर्ण करायची तंबी दिली आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना कामं वेळेत पूर्ण करायची तंबी दिली आहे. तसंच सरकारच्या योजनांचा योग्यप्रकारे प्रसार करा असा आदेशही मोदींनी मंत्र्यांना दिला आहे.
सामाजिक क्षेत्रांमधील योजना पूर्ण करण्यासाठी वेळ निश्चित करा, यामध्ये कोणत्याही प्रकारचा उशीर चालणार नाही. सरकार एका योजनेची घोषणा करतं तेव्हा सामान्यांच्या अपेक्षा वाढतात, असं मोदी मंत्र्यांना संबोधित करताना म्हणाले.
या बैठकीवेळी मंत्र्यांनी आपल्या कामाचा आढावा पंतप्रधानांना दिला. तेव्हा तुम्ही केलेलं काम मलाच माहिती नाही, तर सामान्यांना कसं कळणार, त्यामुळे आपल्या कामाचा प्रचार करा, अशा शब्दांमध्ये मोदींनी मंत्र्यांना खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोदींच्या या बैठकीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, हरसिमरत कौर, जे.पी.नड्डा हे मंत्री उपस्थित होते.