मुंबई : पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ५ राज्य़ांच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. अमित शहा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चाणक्य ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी नेतृत्व दिलं आणि या नेतृत्वाला ग्राऊंड लेवलवर यशस्वी अमित शहा यांनी केलं. त्यामुळे भारतीय राजकारणात मोदी-शहा युगाची सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी आणि शहा हे दोघेही आक्रमक नेते आहेत. त्यांच्या आक्रमकतेच्या जोरावरच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळालं. २०१४ लोकसभा निवडणुकीत यूपीतून भाजपला ७२ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्येही अमित शहा यांचा मोठा हात होता. शहा यांनी छोट्या-छोट्या पक्षांना आपल्याकडे घेतलं. जातीच्या राजकारणाचीही गणितं त्यांनी जुळवली. त्यांचं बूथ मॅनेजमेंट आणि शक्यतांचा अभ्यास खूपच प्रभावी असतो. त्यामुळे त्यातून त्यांना हवा तो रिझल्ट मिळतो.


उत्तर प्रदेशात यादव घराण्यातील कलहानंतर अखिलेश कुमार एक प्रभावी नेते म्हणून समोर आले. त्यामुळे सुरुवातीला एक्झिट पोल अखिलेश कुमार यांच्या बाजुने होते. त्यानंतर काँग्रेससोबत आघाडी अखिलेश यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलं गेलं. तर दुसरीकडे भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देखील घोषित केला नव्हता. भाजपमध्ये तिकीट वाटपावरुनही वाद झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळे अखिलेश कुमार सर्व पक्षावर भारी पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती.


उत्तर प्रदेशात सगळं काही सुरुवातीला अखिलेश यांच्या बाजूने होतं पण जेव्हा पंतप्रधान मोदी यूपीच्या निवडणुकीत उतरले तेव्हा परिवर्तन सुरु झालं. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी धुरा हातात घेतली आणि त्यानंतर रोड शो ज्या प्रकारे सुरु झाले ते थांबायचं नावच घेत नव्हते. रेकॉर्ड तोड सभा दोघांनी केल्या. पण चेहऱ्यावर इतकाही थकवा दिसला नाही. विरोधकांवर हल्ला करतांना पंतप्रधान मोदींचा जोश प्रत्येक वेळी तसाच होता. तिसऱ्या टप्प्यातील मतदानापुर्वी उत्तर प्रदेशात फक्त एकच चर्चा सुरु झाली होती ती म्हणजे पंतप्रधान मोदींची. ३ दिवस ते यूपीमध्ये ठान मांडून बसले होते. पण विरोधक त्यांची गती पक़डण्यात सपशेल अपयशी ठरले.


पंतप्रधान मोदींनी अमित शहा यांच्यासोबत ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराचा मोर्चा सांभाळला आणि त्यानंतर ज्या प्रकारे रोड शो झाले तज्ञ्जांच्या मते असा निवडणूक प्रचार याआधी इतिहासात कधीच झाला नव्हता. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 


पंतप्रधान मोदी जनतेच्या मनातील भावना योग्य प्रकारे समजतात आणि त्यानुसारच बोलतात आणि निर्णय घेतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळेच की काय नोटबंदी सारख्या कठोर निर्णयानंतरही मोदींना लोकांचं समर्थन मिळालं आणि सर्जिकल स्ट्राईक सारख्या निर्णयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा याचा राजकीय युगाची सुरुवात झाली असल्याचं बोललं जातंय. २०२४ नंतरच आता विरोधकांनी विचार करावा असं देखील विरोधी पक्षातील नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.