नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे लवकरच जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात अनावरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. संग्रहालयातर्फे त्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे हुबेहुब पुतळे उभारले गेले आहेत. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय यांसारख्या अनेक जगप्रसिद्ध भारतीयांचा यात समावेश आहेत. मेणाचा पुतळा असणारे नरेंद्र मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान असणार आहेत. 


या संग्रहालयाच्या जगभरातही काही शाखा आहेत. २०१६ सालच्या सुरुवातीच्या काळात या संग्रहालयाच्या एका टीमने नवी दिल्लीत नरेंद्र मोदींच्या शरीराची मापे घेतली. एप्रिल महिन्यात या पुतळ्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. मोदींची स्टाईल असलेला 'मोदी कुर्ता' घातलेला हा पुतळा 'नमस्ते'च्या पोझमध्ये उभा असेल, अशी माहिती मिळते आहे. 


या संग्रहालयातर्फे गेली १५० वर्षे अशा प्रकारच्या पुतळ्यांची निर्मिती केली जात आहे. संग्रहालयाने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यातील लोक मोदींच्या शरीराच्या मापांसकट त्यांच्या डोळ्यांचा रंग, केसांची रंगसंगती या सर्व बाबींची सूक्ष्म माहिती घेताना दिसतायत. मोदींच्या समर्थकांना आता या पुतळ्याचे अनावरण कधी होणार याची उत्सुकता लागलेली असणार यात शंका नाही.