लखनऊ : मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ वर्षीय मुलगी घनदाट जंगलात माकडांसोबत राहाते असं सांगितलं तर कुणी विश्वास ठेवणार नाही. लहानपणीचा टीव्हीवरचा मोगली मात्र नक्की आठवेल. पण हे खरंय टीव्हीतल्या मोगलीप्रमाणेच उत्तर भारतात एक मुलगी माकडांसोबत राहत असल्याचं समोर आले आहे. तिची सुटका करण्यात आलीय. ती माकडांप्रमाणेच चालते.  बहारिचच्या जंगलात ती राहायची. 


उत्तरप्रदेश पोलिसांनी तिची सुटका करून रुग्णालयात दाखल केलं. माकडांसोबत ती सहज वावरत होती. तिची माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. ती जंगलात कशी पोहचली. नेमका किती काळ ती जंगलात राहिलीय. या सा-याची माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. काही लाकुडतोड्यांनी तिला जंगलात पाहिलं.  त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुरेश यादव यांनी तिला पाहिलं. यादव त्यावेळी गस्तीवर होते. दोन महिन्यांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल केलंय. 


तिची वागणूक माकडांप्रमाणेच आहे. शिवाय भाषाही तिला समजत नाहीये. ती माकडांसारखीच हातांवर चालते. जमिनीवर असलेलंच तोंडाने खाते. वैद्यकीय अधिका-यांनी याबाबत माहिती दिलीय. पण योग्य उपचारांनंतर ती फक्त पायांवर चालायला सुरुवात करेल आणि जेवणही व्यवस्थीत घेईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. तिला भाषा समजत नसली तरी आपण तिच्याशी जे बोलू ते थोडफार समजून घेण्याचा ती प्रयत्न करते आणि मानही हलवून अनुमोदन देते. 


तिने कपडे घातले होते मात्र तिच्या अंगावर माकडांनी जखमा केलेल्या होत्या असं पोलिसांनी सांगितले. ती अत्यंत अशक्त झालेली होती. तिच्यात प्रगती दिसतेय असंही सांगायला ते विसरले नाहीत. लवकरच ती सामान्य माणसांप्रमाणे वागू लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.